...तिथे केसरकर चिज काय : राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

राणेंना घाबरलो नाही तर केसरकर काय चिज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे माझे जवळचे सहकारी आहेत. त्यामुळे मला काही भीती नाही आणि केसरकर यांना भिण्यासाठी माझे काही दारु जुगार किंवा मटक्याचे धंदे नाहीत...

सावंतवाडी - माझ्यासह कुटुंबावर अ‍ॅटेक करण्याचा प्रयत्न झाला. मला व्यवसायात, राजकारणात संपविण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही मी नारायण राणेंना घाबरलो नाही तर दीपक केसरकर काय चिज आहेत. त्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणारा हा राजन तेली नव्हे, असा प्रतिइशारा भाजपाचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज (सोमवार) येथे दिला.

तेली यांनी पालकमंत्री म्हणून केसरकर अयशस्वी ठरल्याने त्यांना बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर केसरकर यांनी तेलींचे शंभर अपराध अद्याप भरायचे आहेत. त्यानंतर त्यांच्यावर बोलेन आणि त्यावेळी त्यांना बाहेर फिरणे कठीण बनेल असा इशारा दिला होता. याला आज पत्रकार परिषद घेत तेली यांनी उत्तर दिले. 

"केसरकर यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी नाहक माझ्यावर चिखलफेक करु नये. त्यांना नगराध्यक्ष असताना मी मदत केली नसती तर ते आज राजकारणात दिसले सुध्दा नसते. जिल्ह्यात मला फिरायला देणार नाही असे सांगणार्‍या केसरकर यांनी आपला थंड दहशतवाद थांबवावा. माझी पार्श्‍वभूमी एका सामाजिक कार्यकर्त्याची आहे. लोकांच्या भल्यासाठी मी आजपर्यंत गुन्हे झेलले ते सर्व राजकीय आहेत. त्यामुळे मला कोणाची भीती नाही. कणकवली येथील भिसे हत्याकांडात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी मला नाहक अडकविले होते. त्यांची फळे आज ते भोगत आहेत; केसरकर यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सर्वज्ञात आहे. त्यांनी माझ्यासोबत कधीही या विषयावर आमने सामने यावे. ते यात हरले तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा आणि मी हरलो तर मी राजकारणातून कायमचा निवृत्त होईन. हे माझे आव्हान केसरकर स्वीकारतील का?,'' असे तेली म्हणाले.

तेली पुढे म्हणाले, “नगराध्यक्ष असताना केवळ मी पाठिंबा दिल्यामुळे केसरकर राजकारणात यशस्वी होवू शकले. त्यावेळी मला पाठिंब्यासाठी त्यांनी पन्नास फोन केले; मात्र आता मी सावंतवाडी बाहेरचा आहे, असे सांगुन श्री. केसरकर हिणवत आहेत. त्यावेळी त्यांनी माझी मदत घेतली ती केवळ स्वार्थासाठी होती. काम झाले की दुसर्‍याची गरज नाही अशी त्यांची मानसिकता आहे. केसरकर हे आज एकीकडे मला आणि दुसरीकडे राणेंना शिव्या घालत आहेत. त्यामुळे आपणच सभ्य आहोत, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; केसरकरांनी मला धमक्या देवू नये. माझ्यासह कुंटूबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला व्यवसायात आणि राजकारणात संपविण्याचा प्रयत्न केला; मात्र असे असूनही राणेंना घाबरलो नाही तर केसरकर काय चिज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे माझे जवळचे सहकारी आहेत. त्यामुळे मला काही भीती नाही आणि केसरकर यांना भिण्यासाठी माझे काही दारु जुगार किंवा मटक्याचे धंदे नाहीत. त्यामुळे आमने सामने करायचेच असेल तर केसरकर यांनी वेळ द्यावी मी त्या ठिकाणी एकटा येवून प्रत्यूत्तर देईन.”

केसरकरांना शिवसेनेत किंमत नाही
तेली म्हणाले, “केसरकर जातील त्या पक्षात राजकारण करण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यांना आता शिवसेनेत सुध्दा म्हणावी तशी त्यांना किंमत राहिलेली नाही. जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्यावर विश्‍वास सुध्दा ठेवत नाही ही वस्तुस्थिती आहे.”

Web Title: Rajan Teli criticizes Kesarkar