मग कचरा टाकायचा तरी कोठे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

राजापूर - हर्डी येथील घनकचरा प्रकल्पामध्ये कचरा टाकू नये, अशी सूचना पालकमंत्र्यांनी पालिकेला दिली खरी; मात्र त्यामुळे शहरातील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावायची कोठे? हा पालिकेपुढे प्रश्‍न आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या जागेचा शोध घेणे हे आव्हानच आहे.

राजापूर - हर्डी येथील घनकचरा प्रकल्पामध्ये कचरा टाकू नये, अशी सूचना पालकमंत्र्यांनी पालिकेला दिली खरी; मात्र त्यामुळे शहरातील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावायची कोठे? हा पालिकेपुढे प्रश्‍न आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या जागेचा शोध घेणे हे आव्हानच आहे.

पालिकेने पर्यायी जागा शोधण्यास सुरवातही केली. मात्र, ही जागा उपलब्ध होईपर्यंत गोळा होणाऱ्या कचऱ्याची नेमकी कुठे आणि कशी विल्हेवाट लावावी, याचे उत्तर मात्र मिळालेले नाही. पालिकेने स्वमालकीची जागा खरेदी करून हर्डी येथे घनकचरा प्रकल्प उभारला. तेथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. त्याचा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. 

स्थानिक पातळीवर दाद न लागल्याने पालकमंत्र्यांकडे त्यांनी धाव घेतली. तेव्हा श्री. वायकर यांनी १ जूनपासून हर्डी येथील घनकचरा प्रकल्पामध्ये कचरा टाकू नका, अशा आदेशवजा सूचना केल्या. सद्यःस्थितीत अन्य ठिकाणी कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या जागेचा शोध घेणे हे आव्हानच आहे. 

पालिकेपुढे यक्ष प्रश्‍न
कचरा टाकण्यासाठी मोकळ्या चिरेखाणींचा उपयोग शक्‍य आहे. मात्र, त्या उपलब्ध व्हायला हव्यात. तशा त्या झाल्या तरी त्या वापरण्यास स्थानिक ग्रामस्थ सहकार्य करणार का? असे प्रश्‍न आहेतच. चिरेखाणीत कचरा टाकून त्यावर माती टाकण्यापलीकडे उपाय नाही. त्यासाठी माती खणून आणावी लागेल. महसूलला त्याची रॉयल्टी द्यावी लागेल. म्हणजे खर्च वाढला. मालकीची जागा असूनही पालिकेपुढे हे आज यक्ष प्रश्‍न आहेत.

टॅग्स