रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी राजेश सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

शेट्येंचा प्रवेश हुकला - साळुंखे, मोरे, कुळकर्णी स्वीकृत नगरसेवक

शेट्येंचा प्रवेश हुकला - साळुंखे, मोरे, कुळकर्णी स्वीकृत नगरसेवक

रत्नागिरी - पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी उदय सामंत यांचे कट्टर समर्थक व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत यांची वर्णी लागली. स्मितल पावसकर यांचेही नाव चर्चेत होते; मात्र खासदार विनायक राऊत यांनी सावंत यांचे नाव घोषित केले. स्वीकृत नगरसेवकपदासाठी जुने जाणते प्रशांत साळुंखे आणि एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या किशोर मोरे यांना संधी देत जुन्या-नव्यांचा ताळमेळ राखला. अपेक्षेप्रमाणे भाजपने शहर सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांना संधी देऊन भाजपचा चेहरा अधिक तरुण राखण्याचा प्रयत्न केला. दोन अपक्षांच्या साथीने पालिका प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यसम्राट उमेश शेट्ये यांच्या पदरी पुन्हा अपयश आले.

स्वीकृत नगरसेवक निवड आज पालिकेच्या सभागृहात झाली. काल सायंकाळी स्वीकृत नगरसेवक म्हणून किशोर मोरे, प्रशांत साळुंखे व उमेश कुळकर्णी यांची नावे घोषित झाली होती. मात्र उपनगराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने स्थानिक नेत्यांना निर्णय घेता आला नाही. यातून नाराजीचे नाट्य घडू नये म्हणून खासदार राऊत यांना नाव घोषित करण्यास सांगण्यात आले. आज त्यांनी राजेश सावंत यांची निवड जाहीर केली. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष पंडित यांनी स्वीकृत व उपनगराध्यक्षपद जाहीर केले. पालिका निवडणुकीत आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वामुळे ३० पैकी १७ जागांवर यश मिळाले. त्यामुळे आज सामंत यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी उपस्थित राहिले. त्यांनी स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्षांचे विशेष अभिनंदन केले.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी २३ डिसेंबरला कार्यभार स्वीकारला. शिवसेनेकडे महिला  नगरसेवकांची संख्याही भरपूर असल्याने महिलेला उपनगराध्यक्षपद द्यावे, असा सूर होता. त्यामुळे स्मितल पावसकर, रशिदा गोदड यांची नावे चर्चेत होती. मात्र ही सर्व नावे मागे पडली आणि राजेश सावंत यांचे नाव जाहीर झाले. स्वीकृत नगरसेवकपदासाठीही राजन साळवी यांचे भाऊ संजय साळवी इच्छुक होते. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. शिवसेना उपशहरप्रमुख व नेहमीच मदतीला धावून जाणाऱ्या प्रशांत साळुंखे यांची निवड झाली. शिवसेना पक्षप्रमुखांसह सर्व वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधींकडे पत्रकारांनी किशोर मोरे यांना संधी मिळावी, असा आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख तथा नगरसेवक बंड्या साळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: rajesh sawant dy. mayor ratnagiri