वायरीवासीयांनी रस्ता रोखला

वायरीवासीयांनी रस्ता रोखला

मालवण - वायरी-भूतनाथ येथील महाविद्यालयीन विद्यार्थी मोहित झाड याला गंभीर मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ हे पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वायरी भूतनाथच्या ग्रामस्थांनी वायरी तारकर्ली रस्त्यावर दीड तास रास्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडले. पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच सतीश आचरेकर याला हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. 

दरम्यान, पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ग्रामस्थांना संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला.

काल सायंकाळी बंदरजेटी येथील मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या मोहित झाड याच्यावर गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात संशयित आरोपी असलेल्या सतीश आचरेकर आणि अन्य एका युवकावर मोहित झाड याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित दोन्ही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, सतीश आचरेकर याच्याशी संबंधित असलेल्या बंदरजेटीवरील दोन्ही स्टॉलची काल रात्री उशिरा मोडतोड करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार आचरेकर कुटुंबीयांनी आज सकाळी येथील पोलिस ठाण्यात दिली.

मारहाणीच्या घटनेनंतर फिर्याद देण्यासाठी गेलेला लक्‍झरी चालक राजन चव्हाण याच्याच कॉलरला पकडून ओढत नेण्याचा प्रताप उपनिरीक्षकांनी केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. श्री. चव्हाण याला सतीश आचरेकर याने केलेल्या मारहाणीची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली असती तर आचरेकर याच्याकडून  पुन्हा मारहाण करण्याची हिंमत झाली नसती, असे सांगत ग्रामस्थांनी आक्रमकपणे पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्याकडे दाद मागितली. स्कुबा व्यावसायिक सतीश आचरेकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही त्याला हद्दपार केले नसल्याने त्याच्या हद्दपारीचीही मागणी ग्रामस्थांनी करत तब्बल दीड तास रास्ता रोको केले.

आज सकाळी भूतनाथ मंदिरात ग्रामस्थांनी एक बैठक घेत मोहित झाड याला मारहाण करण्यात आलेल्या आरोपींवर कारवाई करणे आणि पोलिस उपनिरीक्षक सागर वाघ यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती पोलिस पाटील पांडुरंग चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. यानंतर बोडके प्रत्यक्षात ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी भूतनाथ मंदिर येथे दाखल झाले. या वेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर अक्षरशः प्रश्‍नांची सरबत्ती केली. पोलिस उपनिरीक्षक वाघ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला लक्‍झरी चालक चव्हाण याला एखाद्या आरोपीप्रमाणे त्याच्या कॉलरला पकडून त्याला ओढत नेण्याचा प्रकार केला होता. तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार न घेता, तब्बल दोन ते तीन तास थांबवून ठेवले होते. त्यानंतर तक्रारीविनाच घरी जाण्यास सांगितले, असे चव्हाण याने पोलिस निरीक्षकांना सांगितले. या वेळी ग्रामस्थांनी सतीश आचरेकर याला तडिपार करण्याची कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर पोलिस निरीक्षकांना वाघ यांची चौकशी करण्याचे आश्‍वासन देत त्या ठिकाणाहून निघून गेले.

या वेळी सरपंच सुजाता मातोंडकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, काँग्रेस तालुकाप्रमुख मंदार केणी, कमलाकर चव्हाण, संजय लुडबे, भगवान लुडबे, प्रसाद आडवणकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, अवी सामंत, लारा देसाई, महेश देसाई, संदेश चव्हाण, गौरव प्रभू, बबन चव्हाण, मंदार लुडबे, कृष्णा देऊलकर, भालचंद्र केळुसकर, गोट्या मसूरकर, अन्वय प्रभू, प्रदीप मांजरेकर, बाबा मोरजकर, पोलिस पाटील पांडुरंग चव्हाण तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंदरजेटीवरील मारहाणप्रकरणी सतीश आचरेकर व त्याच्या मित्रावर भादवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आचरेकर याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून एक प्रस्ताव बनविण्यात येईल. याप्रकरणी गंभीर जखमी असणाऱ्या मोहित याचा जबाब आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचा जबाब घेण्यासाठी पोलिस पथक गोव्याला पाठविण्यात आलेले आहे. त्याच्या जबानीनंतर यात दोन पेक्षा अधिक आरोपी आहेत काय? याचा उलगडा होणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पद्‌मजा चव्हाण यांनी दिली. बंदरजेटीवर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बंदरजेटीवरील मारहाणीप्रकरणीही चौकशी करण्यात येईल. सतीश आचरेकर हा पसार झालेला असून मोबाईल लोकेशन बंद येत आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे, असेही उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले.
 

चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करू
पोलिस निरीक्षक बोडके यांनी उपनिरीक्षक वाघ यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल आणि सतीश आचरेकर याच्यावरील सर्व गुन्ह्यांची माहिती न्यायालयात सादर करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. ग्रामस्थांनी पुकारलेल्या अचानक रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांची भावना सांगितली तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com