रत्नागिरीत मुसळधार; 101 मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

रत्नागिरी : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा रत्नागिरी तालुक्‍याला बसला. मिऱ्या डोंगरावर ढगफुटी झाल्याप्रमाणे झालेल्या पावसाने आनंदनगर कॉलनीत पाण्याचा लोंढा घुसला. त्यात तीन घरांचे नुकसान झाले. किल्ला येथे घरावर भिंत कोसळून तीनजण जखमी झाले आहेत. वायंगणीत पाणी भरल्याने तीन तास गावाचा संपर्क तुटला होता. निवखोल भिंत कोसळून सहा घरांमध्ये पाणी घुसले. दिवसभरात रत्नागिरीत 101 मिमी पावसाची नोंद झाली.

कोकणात मॉन्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले; मात्र रत्नागिरी आणि संगमेश्‍वर तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागांत पाऊस पडला नाही. काल (ता. 12) रात्री भडे, जाकादेवी, पावसला पाऊस झाला. दुपारी विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्याने रत्नागिरीला झोडपले. मुसळधार पावसामुळे वायंगणी येथील नदीला आलेल्या पुराने गावाचा संपर्क तुटला. सुमारे तीन तास पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. रत्नागिरीत आलेल्या ग्रामस्थांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी पोलिसपाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले होते.

किल्ला येथे इस्माइल अली मुजावर यांच्या घरावर भिंत कोसळून नुकसान झाले. घरामध्ये असलेले इस्माइल आणि घरातील दोघे जखमी झाले. त्यात बानू मुजावर, अमिना मुजावर यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवखोल येथील संतोष भुर्केंच्या चाळीजवळ पाच फूट भिंत घरावर कोसळली. त्यामुळे नाल्याचे पाणी भाडेकरूंच्या घरात शिरले. पालिकेने वेळीच लक्ष न दिल्याने हे नुकसान झाल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले.