रत्नागिरी पालिकेला पाणी देण्यास एमआयडीसीचा नकार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रत्नागिरी - येथील औद्योगिक विकास महामांडळाच्या (एमआयडीसी) पाच धरणांपैकी आसोंड धरणाला गळती लागल्याने ते नादुरुस्त बनले आहे. उर्वरित चार धरणांमध्ये मेपर्यंत पुरेल एवढा पाण्याचा जेमतेम साठा आहे. त्यामुळे पालिकेने पाण्यासाठी केलेली मागणी एमआयडीसीकडे धुडकावल्याने शहरात पाण्याचा प्रश्‍न आणखी गंभीर होण्याची शक्‍यता आहे. 

एमआयडीसीची काजळी नदीवर सुमारे पाच धरणे आहेत. निवसर, हरचिरी, आसोंड, अंजणारी, घाटीवळे या धरणांचा यामध्ये समावेश आहे. एमआयडीसी भागातील उद्योगांना आणि तालुक्‍यातील 12 ग्रामपंचायतींना एमआयडीसी पाणीपुरवठा करते. त्यातून एमआयडीसीला मोठे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी 15 एप्रिलदरम्यान एमआयडीसीने पाणी कपात केली होती. या वर्षीही तीच स्थिती आहे. आसोंड धरणाला मोठी गळती असल्याने ते नादुरुस्त बनले आहे. या धरणामध्ये पाणीसाठा नाही. घाटीवळे धरणातील पाणीसाठा अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तीन धरणाच्या जोरावरच पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे हे पाणी मेपर्यंत जपून वापरण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे. त्यातच आता पालिकेने एमआयडीसीकडे पाण्याची मागणी केली आहे. शहरामध्ये फेब्रुुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई भासत आहे. दरदिवशी विविध भागांतील नागरिक पाण्यासाठी पालिकेचा रस्ता धरत आहेत. त्यांना केवळ आश्‍वासन देऊन वेळ मारून नेली जात आहे. कोकणनगर, नाचणेतील काही भागात एमआयडीसीचे पाणी जाते; म्हणून पालिकेने काही दीड ते दोन एमएम पाणी जोडणी देण्याची मागणी केली होती. एमआयडीसीकडेच पाणीसाठा कमी असल्याने त्यांनी पालिकेचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. पाणी नाकारल्याने पालिकेसमोर पाण्याचे मोठे संकट उभे आहे. 

Web Title: Ratnagiri BMC water issue