संस्कृतीच्या गोंडस नावाखाली घुसमट

संस्कृतीच्या गोंडस नावाखाली घुसमट

रत्नागिरी - महिलांवर होणाऱ्या अत्याचारापैकी कौटुंबिक हिंसाचार हा एक भाग आहे. जगभरात स्त्रियांना भेदाभेद आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते किंवा विशेष प्रकारच्या हिंसेला तोंड द्यावे लागते. याचा दृश्‍य भाग अनेक वेळा कडू गोळी साखरेत घोळून द्यावी तशा पद्धतीचा असतो. संस्कृतीच्या गोंडस नावाखाली हिंसाचार होतो. वेगवेगळ्या निरीक्षणांमध्ये ही गोष्ट स्पष्ट सिद्ध झाली आहे. मात्र हिंसाचारातून स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही विकृतीदेखील तयार होतात.

प्रा. बीना कळंबटे यांनी इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्समध्ये महिलांच्या सबलीकरणाचे स्वरूप यावर सादर केलेल्या शोधनिबंधामध्ये स्त्रियांबाबत होणाऱ्या हिंसेचे अनेक पैलू तपासून बघितले आहेत. त्यासाठी केलेल्या पाहणीतून बहुसंख्य मुली आणि महिलांना आपल्याबाबत छळ होतो आहे, याची जाणीवच नव्हती. अनेक वेळा तशी जाणीव नसते, असे आढळून आले. संस्कार, संस्कृती या गोंडस नावाखाली त्यांच्यावर लहानपणापासून चार भिंतींच्या आत घडलेले बाहेर सांगू नकोस, असे बिंबवले जाते. यामुळे सहन करणे किंवा नशिबाला दोष देणे असे पर्याय महिलांपुढे राहतात. यातून त्यांना प्रचंड मानसिक ताणाला तोंड द्यावे लागते, असे सांगून प्रा. कळंबटे म्हणाल्या की, अशा हिंसात्मकतेमुळे अतिताण किंवा चिंता निर्माण होतात. मनावर दडपण येते. त्यातून एंक्‍झायटी अर्थात दुष्चिंता अनेक महिलांमध्ये आढळून येतात. महिलांवरील हिंसाचारात धोकादायक पहिल्या पाच देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. 

तसेच पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राचा महिलांसंबंधी हिंसेत चौथा क्रमांक आहे. एकूण गुन्ह्यांपैकी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण ४१.१२ टक्के आहे. कौटुंबिक हिंसा ही सर्वत्र घडणारी पण न सांगितली जाणारी सत्य परिस्थिती आहे, असे पाहणीत आढळून येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हिंसाचार फक्त सासरीच नव्हे, तर माहेरीही होतो. शिक्षण नाकारणे, नोकरी करू न देणे, बालविवाह, नातेवाइकांकडूनच छळ व अत्याचार याला मुली माहेरीही बळी पडतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचा अभ्यास करताना मेन्टल हेल्थ स्केलशी या गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर मानसिक स्वास्थ्य चांगली असलेली महिला कोणत्याही अडचणी स्वतः सोडवते. स्वास्थ्याचा प्रभाव हा तणाव हाताळण्याची क्षमता आणि निर्णय शक्तीवर पडतो. २००५ पासून कायद्यान्वये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण मिळत असले, तरी मुळात हिंसाचार होतो याची जाणीव नसेल, तर अशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणेही कठीण होते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदले.

जिल्ह्यात काही संस्थांची कामगिरी
कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास सहन करणाऱ्या महिलांच्या कायदेशीर हक्कापुरते काम न करता त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने समुपदेशन करण्यामध्ये जिल्ह्यातील तीन संस्था उत्तम काम करीत आहेत. लांजा तालुक्‍यातील हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, देवरूख येथील स्नेहसमृद्धी, संगमेश्‍वर तालुक्‍यातील साहिल या संस्था आयएलसी विधी महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यासकेंद्र व स्वीस एड इंडिया यांच्या साह्याने अडीच वर्षे या क्षेत्रात काम करीत आहेत. रत्नागिरीमध्ये स्वयंसेतू संस्थेच्या श्रद्धा कळंबटेही याबाबत काम करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com