रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, देवरुख, मंडणगडला मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या वर्षी मोसमी पाऊस वेळेत हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे. गणपतीपुळ्यात सुटीसाठी आलेल्या पर्यटकांची पावसाने त्रेधातिरपीट उडविली.

पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिक सुखावले. चार दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण भागात मोसमीपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पडलेल्या कडाक्‍याच्या उन्हाने रत्नागिरीकर त्रस्त झाले होते. सोमवारी (ता. 29) सायंकाळी हलकीशी सर पडून गेली. त्यानंतर वातावरणही ढगाळ होतेच. आज दुपारी पावसाला सुरवात झाली. सायंकाळी थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वारे वाहू लागल्यामुळे वीजही गायब झाली होती.

देवरुखात पडलेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठेतील गटारे तुंबली आणि खराब पाणी रस्त्यावर आले. गुहागर, लांजा, राजापूरमध्येही पावसाने हजेरी लावली होती. किनारी भागात वेगवान वाऱ्यामुळे लाटांचा वेग वाढला होता.