बारा ते पंधरा मीटर उंच लाटा; मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

रत्नागिरी - उधाणाच्या भरतीच्या सुमारे १२ ते १५ मीटर उंचीच्या अजस्र लाटांनी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ठिकठिकाणी भगदाड पडले. तीन ते चार ठिकाणी बंधारा वाहून गेल्याने समुद्राचे पाणी लोकांच्या घरापर्यंत येऊ लागले आहे. भाटीमिऱ्या, पांढरा समुद्र, नवानगर भागातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहावे लागते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. 

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा उधाणाच्या भरतीने पुन्हा तकलादू ठरला आहे. तेथील रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाशी भांडून, आंदोलन करून सुमारे ९०० ते १२०० मीटरचा  बंधारा मंजूर करून घेतला. जुन्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबरोबर नव्याने भाटीमिऱ्या आणि पांढरा समुद्राच्या बाजूला वर्ष, दोन वर्षांपूर्वी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. अंतर्गत वादामुळे काही भागात तो राहिला होता. परंतु नंतर पूर्ण करून घेण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ-मोठे दगड टाकून हा बंधारा घालण्यात आला आहे. या वर्षीतरी सुरक्षित असू, असा समज मिऱ्या, पांढरा समुद्र, नवानगर येथील रहिवाशांचा होता. परंतु उधाणाने तो फोल ठरवला आहे. गेली काही दिवस ‘हायटाईड’मुळे भरतीच्या उधाणावेळी १२ ते १५ मीटरच्या लाटा उसळत आहेत. त्याचा मोठा फटका या बंधाऱ्याला बसला आहे. 

आज दुपारी बारा वाजल्यापासून समुद्राला येणाऱ्या भरतीने भाटीमिऱ्या, पांढरा समुद्र, नवानगर आदी भागातील नागरिकांच्या पोटात गोळा आला होता. अनेक नागरिक अजस्त्र लाटा पाहण्यासाठी किनाऱ्यावर होते. तेव्हा दोन दिवसातील या भरतीने बंधाऱ्याला तीन ठिकाणी भगदाड पडले आहे. अनेक ठिकाणी दगड समुद्रात वाहून गेले आहेत. त्यामुळे रिकाम्या जागांमधून लाटांचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत येत आहे. 

मिरकरवाडा येथे झालेल्या ‘टी’ आकाराच्या बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांचा दाब मिऱ्या भागाकडे वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या धोकादायक भागाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाय योजना करण्याची गरज आहे. 

लाटेचे पाणी घरापर्यंत...
समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या लाटा एवढ्या मोठ्या आहेत की बंधाऱ्याचे दगड त्यामुळे वाहून जात आहेत. एखाद्या मोठ्या लाटेचे पाणी तर आमच्या घरापर्यंत येते. जीव मुठीत घेऊन येथे राहावे लागते. जिल्हा प्रशासनाने तत्काळ याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तेथील रहिवासी श्री. पाटील यांनी केली.