टिकलेश्वर दर्शन आता सुलभ पायऱ्या-पायऱ्यांनी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

साडवली - संगमेश्वर तालुक्‍यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, यासाठी शासनाने पर्यटन स्थळाच्या दर्जानुसार निधी मंजूर केला आहे. देवरूखजवळील श्रीक्षेत्र टिकलेश्वरचे भाग्य त्यामुळे उजळले आहे. तेथे जाण्यासाठी पक्का पायऱ्यांचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

साडवली - संगमेश्वर तालुक्‍यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा यासाठी शासनाने पर्यटन स्थळाच्या दर्जानुसार निधी मंजूर केला आहे. देवरूखजवळील श्रीक्षेत्र टिकलेश्वरचे भाग्य त्यामुळे उजळले आहे. तेथे जाण्यासाठी पक्का पायऱ्यांचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

हा निधी मिळावा यासाठी जि.प. ओझरे गटाच्या सदस्य सौ. मुग्धा जागुष्टे यांनी पाठपुरावा केला होता. टिकलेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी मोठा डोंगर चढावा लागतो. या डोंगरावर अवघड पायवाट आहे. यामुळे भाविकांना हा डोंगर चढणे सहज शक्‍य होत नाही. याच मार्गाचा अर्धा भाग याआधी ठेकेदार सुरेंद्र देसाई यांनी पायऱ्या बांधून पूर्ण केला आहे. उर्वरित अवघड चढणीच्या भागासाठी पर्यटन विभागाकडून १४ लाख मंजूर झाले आहेत. हे काम शासनमान्य ठेकेदार कोसुंबचे प्रियेश जाधव यांच्या कंपनीला देण्यात आले.

श्रीयेश जाधव यांनी तळवडे येथील बांधकाम कारागीर घेऊन पायऱ्या बांधणे, त्यावर टाईल्स बसवणे, दुतर्फा रेलिंग करणे अशी मजबुतीकरणाची कामे सुरू केली आहेत. डोंगरावर जाण्यासाठी वाट अत्यंत अवघड आहे. याच भागात पायथ्यापासून खडी, वाळू, सिमेंट व पाणी यांची वाहतूक करण्याचे अवघड काम बांधकाम कारागिरांनी केले आहे. यातील बरेचसे काम मार्गी लागल्याचे जाधव यांनी सांगितले.

टिकलेश्वर मार्गावरील या पायऱ्या बांधण्यासाठी बांधकाम विभाग, ठेकेदार राजेश सावंत तसेच जनक जागुष्टे यांचे तसेच तळवडे ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाल्याचे प्रियेश जाधव यांनी सांगितले. आता टीकलेश्वर मार्गावर चांगल्या पायऱ्या व रेलिंग झाल्यामुळे पर्यटक, भाविकांची वर्दळ वाढणार आहे. पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वरनंतर टिकलेश्वर दर्शन आता सहज शक्‍य होणार आहे.