गुहागर तालुक्‍यातील ५ जणांची अनामत जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

गुहागर - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्‍यातील ५ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही राखता आलेली नाही. यामध्ये दोन गावांमधील सरपंचपदाचे चार आणि एक ग्रामपंचायत सदस्य उमेदवाराचा समावेश आहे. तसेच सरपंचपदाच्या व ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत जिंकून आलेल्या दोन उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचे दिलेले राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. 

गुहागर तालुक्‍यातील झोंबडी आणि पाटपन्हाळे या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या प्रत्येकी दोन उमेदवारांची अनामत जप्त झाली. झोंबडी येथील अजय वसंत शिंदे आणि एकनाथ गणपत सकपाळ हे दोन सरपंच पदाचे उमेदवार होते. अतुल लांजेकरांनी सरपंच पदाची निवडणूक एकतर्फी जिंकली. पैकी एकनाथ सकपाळ यांना संपूर्ण गावातून केवळ ९ मतांवर समाधान मानावे लागले.

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय पवार विरुद्ध शबिर साल्हे अशी थेट निवडणूक झाली. येथे सरपंच पदासाठी मधुकर गोविंद चव्हाण आणि रामचंद्र विठ्ठल तेलगडे हे देखील उमेदवार होते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात संजय पवार यांची मते चव्हाण आणि तेलगडे यांना मिळाली, तर पवार पराभूत होतील या दृष्टीने प्रचार मोहीम राबविण्यात आली होती. हे राजकीय डावपेच उधळून लावत संजय पवार यांनी विजयश्री खेचून आणली. मधुकर चव्हाण आणि रामचंद्र तेलगडे यांची अनामतही जप्त झाली आहे. या चार उमेदवारांबरोबरच जानवळे प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढविणाऱ्या अनिता अनंत जाधव यांची अनामतही जप्त झाली आहे.

झोंबडीतील निवडणुकीत अतुल लांजेकर यांनी व पाटपन्हाळेतील निवडणुकीत संजय पवार यांनी सरपंच पदाबरोबर ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही उमेदवारी दाखल केली होती. हे दोन्ही उमेदवार सरपंच व ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे लांजेकर व पवार यांनी लगेचच ग्रामपंचायत सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. हे दोन्ही राजीनामे मंजूर झाले आहेत. येत्या सहा महिन्यांत पाटपन्हाळे आणि झोंबडीमध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.