रत्नागिरीत सात मच्छीमारी नौकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - ट्रॉलिंगचा परवाना वापरून मासेमारीसाठी पर्ससीननेटचा उपयोग करणाऱ्या सात मच्छीमारी नौकांवर सहायक मत्स्य खात्याचे रत्नागिरी परवाना अधिकारी आनंद पालव यांनी कारवाईचा बडगा उगारला. यात साठ हजारांची मासळी जप्त करण्यात आली असून, दंडासाठी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

रत्नागिरी - ट्रॉलिंगचा परवाना वापरून मासेमारीसाठी पर्ससीननेटचा उपयोग करणाऱ्या सात मच्छीमारी नौकांवर सहायक मत्स्य खात्याचे रत्नागिरी परवाना अधिकारी आनंद पालव यांनी कारवाईचा बडगा उगारला. यात साठ हजारांची मासळी जप्त करण्यात आली असून, दंडासाठी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परवाना एक आणि जाळे दुसरेच ठेवून धूळफेक केल्याने त्यांचे ट्रॉलिंगचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये मिरकरवाडा, राजिवडा, गुहागर आणि उरण (रायगड) येथील नौकांचा समावेश आहे. अनुसया रामचंद्र कोळी (अन्नपूर्णा, ७,५०० रुपये मासळी), विष्णू नाटेकर (श्रीकृष्ण प्रसन्न, १८ हजार), इस्माईल अली पांजरी (बिस्मिल्ला, १६ हजार), तौफिक होडेकर (अल मतीन २, आठ हजार रुपये), नाझीम माजगावकर (एकविरा माता, १२ हजार), रिझवाना रफिक वस्ता (रसिका रुहाना, तीन हजार), ओंकार राजन मोरे (समृद्धी, ७ हजार ९०० रुपये) या नौकांवर कारवाई करीत त्यांच्याकडील मासळी जप्त करण्यात आली.

पर्ससीननेटद्वारे मासेमारी करण्यासाठी शासनाकडून १२.५ वावाच्या बाहेरचे क्षेत्र निश्‍चित करून ठेवले आहे; मात्र अनेक मच्छीमार बाहेर जाण्यास तयार नसतात. त्यासाठी काहींनी नवीन शक्‍कल लढविली आहे. मत्स्य विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ट्रॉलिंगचा परवाना घेतलेल्या नौकेवर पर्ससीननेटची जाळी चढविण्यात आली आहेत. पर्ससीननेटसाठी परवाना घेणे आवश्‍यक आहे. सध्या शासनाने पर्ससीन परवान्याला बंदी घातल्याने हा नवीन पर्याय मच्छीमारांनी शोधला आहे.

विनापरवाना मच्छीमारांवर कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे गस्ती नौका नाही. त्यासाठी बंदरावर बसून प्रतीक्षा करावी लागते. परवाना अधिकारी श्री. पालव यांना माहिती मिळाल्यानंतर मिरकरवाडा जेटीवर ते ठाण मांडून होते. त्यानंतर या सात नौकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्या नौकांवर सुमारे साठ हजार रुपयांची मासळी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर पाचपट दंडाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.