गुहागरात कर्जमाफीसाठी धनिकांचेही अर्ज

गुहागरात कर्जमाफीसाठी धनिकांचेही अर्ज

गुहागर - तालुक्‍यातील ६५ ग्रामपंचायती व एका नगरपंचायतीमधून शेतकरी कर्जमाफीसाठी ११,४७७ अर्ज आले आहेत. यामध्ये अनेक धनिकांचाही समावेश आहे. घरात महागडी चारचाकी वाहने असणारी, सुख-सोयींनीयुक्त निवासस्थाने असलेले डॉक्‍टर, वकील, व्यापारी, निवृत्त शासकीय कर्मचारी, बिल्डर, ठेकेदार अशी अनेक नावे यामध्ये आहेत. 

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतलेल्यांची संख्या मोठी आहे. शेती बागायतीसाठी सोसायट्यांकडून खतकर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विकास संस्थांनी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास उद्युक्त केले. तालुक्‍यात विकास संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना मे महिन्यात सोसायटीकडून खतपुरवठा केला जातो. खत कर्जाची रक्कम पाच हजार रुपयांपर्यंत असते. बहुतांश शेतकरी खताचे पैसे भातकापणीनंतर सोसायटीकडे जमा करतात; परंतु त्याऐवजी सोसायट्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. 

या व्यतिरिक्त शेतकरी व बागायतदारांनी बॅंकांकडून मिळणाऱ्या कृषी कर्जाचाही लाभ घेतला. सर्वात कमी व्याजदराचे हे कर्ज वर्षातून एकदा पूर्ण करायचे. लगेचच दुसरी उचल करायची, अशी पद्धत. अशा शेतकऱ्यांचेही कर्जमाफीसाठी अर्ज आहेत. कोकणात थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या फार थोडी आहे. कर्जमाफीसाठी एकाच ॲप्लिकंट आयडीवर कर्जदार आणि पत्नी अशा दोघांची नोंद करायची असल्याने अर्जदारांची संख्या ११४७७ पर्यंत पोचली आहे.  कर्जमाफीचे अर्ज भरताना २६ अंकी अप्लिकंट आयडी तयार होतो. तालुक्‍यातील सुमारे १५० शेतकऱ्यांचे अप्लिकंट आयटी १४ अंकीच आहेत. १७-१८ शेतकऱ्यांचे अप्लिकंट आयडीच तयार झालेले नाहीत. जवळपास ७० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याची माहिती कर्जमाफीच्या वेबसाईटवर दिसत नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी अपूर्ण कागदपत्रे जोडलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपला फॉर्म बिनचूक भरला गेला आहे का खात्री करून घेणे आवश्‍यक ठरणार आहे. 

गावनिहाय कर्जमाफीसाठी आलेले अर्ज 
आरे (२५८), आबलोली (११२), अडूर (७७९), आंबेरे खुर्द (१४), अंजनवेल (९३), असगोली (३०३), असोरे (१३८), भातगांव (७१), चिखली (२९५), चिंद्रावळे (१९१), धोपावे (२५), गिमवी (१३४), गोळेवाडी (७), गुहागर नगरपंचायत (२७३), हेदवी (८९), जांभारी (२८२), जामसूद (११५), जानवळे (१६९), काजुर्ली (१३९), कारुळ (१६३),. काताळे (१११), खामशेत (३९७), खोडदे (१०९), कोळवली (३३), कोंडकारुळ (४३), कोसबीवाडी (२), कोतळूक (४८०), कौंढर काळसूर (३१५), कुडली (३२४), कुटगिरी (२१२), मढाळ (१२५), मळण (१६८), मासु (१२८), मुंढर (२८४), नरवण (८३), निगुंडळ (१६१), पाभरे (१७१), पाचेरी सडा (१४), पाचेरी आगर (३७), पडवे (१२६), पाली (७४), पालकोट तर्फे साखरी त्रिशूळ (१८), पालपेणे (६५९), पालशेत (२०७), पांगारी तर्फे वेळंब (७७), पांगारी तर्फे हवेली (६९), परचुरी (११०), पाटपन्हाळे (२८२), पिंपर (२६५), पोमेंडी (३३), पेवे (२४५), साखरी त्रिशूळ (१२), साखरी आगर (७),साखरी बुद्रुक (२०२), सुरळ (८३), शीर (४४६), शिवणे (४४), तळवली (३७७), तवसाळ (२), उमराठ (९९), वडद (९०), वरवेली (१७१), वेळणेश्वर (३४३), विसापूर (५७), वेळंब (२१२), वेलदूर (६७), झोंबडी (२५२).

ग्रामीण भागातील अनेकांचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक केलेले नाहीत. बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेताना आधार कार्ड तयार करताना घेतलेले ठसे व आज घेतलेले ठसे हे मॅच होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. इंटरनेट सेवेचा स्पीड कमी असल्याने अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्धवट भरलेले अर्ज रद्द करून परत भरावा लागला. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय झाला. 
- लतिश साळगांवकर, संगणक केंद्र कर्मचारी, शृंगारतळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com