काँग्रेसबरोबरच रमेश कदमांनाही बुस्टर

काँग्रेसबरोबरच रमेश कदमांनाही बुस्टर

चिपळूण - माजी आमदार रमेश कदम यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. तरुण वयात काँग्रेसच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. राष्ट्रवादी, शेकाप, भाजपनंतर वयाच्या ७९ व्या वर्षी पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन ते मूळ प्रवाहमध्ये सक्रिय झाले. त्यामुळे कदमांसह चिपळुणात काँग्रेसला बुस्टर मिळणार आहे.

युवक काँग्रेस, तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद आणि दीर्घकाळ चिपळूण शहराचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषविले. सतरा वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. राजकारणात ते ज्येष्ठ झाल्यामुळे नव्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची त्यांची तयारी नव्हती. पक्षाची सूत्रे आपल्या हाती असावी यासाठी त्यांना राष्ट्रवादीत वेळोवेळी झगडावे लागले.

वरिष्ठांकडून योग्य ती दखल घेतली न गेल्यामुळे अखेर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये गेल्यानंतर पक्ष जबाबदारी देईल. चिपळूणची पालिका आपल्या हातात येईल. मतदारसंघात काम करण्याची संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. भाजपने त्यांची कोणतीही अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे ते भाजपमधूनही बाहेर पडले. पुन्हा राष्ट्रवादीत जायचे नाही या निर्णयावर ते ठाम होते.

नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करण्यासाठी श्रेष्ठींना जनमत असलेल्या नेत्याची गरज होती. काँग्रेसमध्ये नेतेपदासाठी स्पर्धा नाही. या संधीचा फायदा घेत कदमांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची सूत्रे रमेश कदमांकडे येणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेतृत्व मिळेल.

आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे कदमांचा काँग्रेस प्रवेश राष्ट्रवादीसाठी फायद्याचा ठरणार आहे. ते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेस विचारसरणी असलेले त्यांचे जुने कार्यकर्ते कदमांपासून लांब गेले होते. ते पुन्हा कदमांबरोबर सक्रिय होतील. कदम राष्ट्रवादीत असताना त्यांनी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची मने दुखावली होती. त्यांच्यासहित काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना त्यांना विश्‍वासात घ्यावे लागणार आहे.

पालिकेतील राष्ट्रवादीचे चार नगरसेवक त्यांच्या बरोबर आहेत किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे पाच नगरसेवक राणेंबरोबर राहतील की रमेश कदमांचे नेतृत्व स्वीकारतील हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. सध्या काँग्रेस व कदम या दोघांसाठी ‘विन-विन सिच्युएशन’ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com