धगधगत्या निखाऱ्यावरील अग्निदिव्य

धगधगत्या निखाऱ्यावरील अग्निदिव्य

रत्नागिरी - परंपरा आणि प्रथांनी कोकणातील सणउत्सव साजरे होतात. त्याचा प्रत्यय प्रत्येक वाडीवस्तींवर येतो. लांजा तालुक्‍यातील भडे गावामध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. गुढी पाडव्याच्या मध्यरात्री आगीवर चालण्याचं अग्निदिव्य सहजतेनं केले जाते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रथेत निखाऱ्यावर चालणारे कधी जखमी झालेत किंवा भाजलेत असं नाही. गावातील सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून सतीचा खेळ या नावाने ओळखली जाते.

कोकणी माणूस हा परंपरा जपणारा म्हणून ओळखला जातो. शिमगोत्सवात पालख्यांसह होळी, नमन यांची रंगत चढते. गावागावांत वेगवेगळ्या प्रथा आणि चालीरीती जपल्या जातात. लांजा आणि रत्नागिरी तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या भडे गावातील आगळी-वेगळी प्रथा सर्वांच्या अंगावर काटा आणणारी आहे. रविवारी (ता. १८) मध्यरात्री हा खेळ रंगला. याची तयारी तब्बल ४८ तास आधी केली जातात. त्यासाठी काही टन लाकडे प्रत्येक घरातून आणली जातात. सायंकाळी पाच वाजता होम पेटवला जातो. होमातून निखारे आणि जळकी लाकडे वेगळी केली जातात. पेटणारी लाकडे बाहेर काढली जातात. 

हे काम ग्रामस्थ सहजतेने करतात. सर्वात मोठा ओंडका कोण उचलून आगीत टाकतो याचीही चढाओढ सुरु असते. नमन आटोपल्यानंतर होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. मानकरी सर्वातप्रथम निखाऱ्यावरुन चालतात. त्यानंतर सर्वचजणं बिनधास्तपणे हे अग्निदिव्य करतात.

या गावात पहिला आलेला मूळ पुरुष मयत झाल्यावर त्याची पत्नी सती गेली. त्या सती गेलेल्या महिलेची आठवण ठेवण्यासाठी गावात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरु आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. सती गेलेल्या महिलेचा गावावर कृपा आर्शीवाद राहतो, अशी गावाची श्रध्दा आहे. लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यत सर्वच बिनधास्तपणे या पेटत्या निखाऱ्यारून अनवाणी धावतात. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथ लोकं येतात. गोवा, कर्नाटक, बिहार राज्यातून सुद्धा हा अनोखी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही वर्षापूर्वी हा प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थाच्या मनात हा सोहळा एक परंपरा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलिकडे जावून या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याचं धाडस इथले शेकडो ग्रामस्थ स्वतःहून करतात. ना कोणावर सक्‍ती असते ना कोणाला गळ घातली जाते. या प्रथेचे काही नियम आहेत. भडे गावातील ग्रामस्थ सोड़ून कुणी त्यात उतरायला किंवा चालायला परवानगी दिली जात नाही. निखाऱ्यावरून चालताना पायात काहीही घातलेले चालत नाही. गावातून मुंबईत नोकरी निमित्ताने गेलेला ग्रामस्थ सुद्दा न घाबरता या अग्नीदिव्यातून जातात. नियम मोडून कुणी चालण्याचा प्रयत्न केला त्याला इजा होवू शकते, असा ग्रामस्थांचा दावा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com