चालत्या दुचाकीवर वीजवाहिनी पडून तरुण ठार

चालत्या दुचाकीवर वीजवाहिनी पडून तरुण ठार

राजापूर -  प्रवाहित वीजवाहिनी चालत्या दुचाकीवर पडून विजेचा धक्‍का बसल्याने तालुक्‍यातील गोवळ-घाडीवाडी येथे तरुण जागीच ठार झाला. विलास लुकाजी बंडबे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. आणखी एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील ओगलेवाडी येथे घडली. याच वीजखांबावरील वाहिनी तुटून दोन जनावरे गणेशोत्सवात दगावली होती. तेथेच पुन्हा दुर्घटना घडल्याने जमाव संतप्त झाला. 

बंडबे सकाळी संतोष बाळकृष्ण गुरव (रा. गोवळ) यांच्या दुचाकीवरून शहरात येत होते. ७.३० वाजण्याच्या सुमारास ओगलेवाडी येथील केळुसकर घरानजीक आले असता अचानक तेथील ३३ केव्हीची वीजवाहिनी तुटून दुचाकीवर पडली. संतोष व विलास या दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे संतोष बाजूला फेकला गेला, तर विलास वीजवाहिनीला चिकटला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.  मागावून आलेल्या दुचाकीस्वारांच्या अपघात निदर्शनास आला. त्यांनी जखमी संतोषला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तुटलेली वीजवाहिनी भारीत असल्याने लोकांना सावध केले. महावितरणचे अधिकारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.

वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जमावाला शांत करून बंडबे याचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेला. तेव्हा  महावितरणचे वरिष्ठ अधिकारी अनिलकुमार डोंगरे पोलिस ठाण्यात हजर झाले. तेथे लोकांनी महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आमदार राजन साळवीही पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी महावितरण कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून लोकांची मागणी उचलून धरली. 

फुलेच नव्हेत, तर विलासचे आयुष्यही कोमेजले
आई-वडील, पत्नी आणि छोटी मुलगी अशा पंचकोनी सर्वसामान्य कुटुंबातील विलास. काही दिवसांपूर्वी त्याने मित्राच्या सहाय्याने राजापुरात फूल व्यवसाय सुरू केला होता. मात्र, आज सकाळी काळाने घाला घातला. या दुर्दैवी अपघातात बंडबे कुटुंबीयांचा आधारवड हरपला. हार बनविण्याच्या कलेत पारंगत असल्याने लवकरच त्याचा व्यवसायात जम बसला. गावातील काही शेतकऱ्यांकडून फुले आणून त्याचे हार विणून तो लोकांना विकत होता.  सकाळी शहरात येत असताना त्याने सोबत आणलेली फुलेच नव्हे, तर त्याचेच आयुष्यही कोमेजून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com