भगवती किल्ल्यावर देशातील पहिला ‘दुर्गरत्न’ प्रकल्प

भगवती किल्ल्यावर देशातील पहिला ‘दुर्गरत्न’ प्रकल्प

रत्नागिरी -  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारा देशातील पहिला प्रकल्प उभारत आहोत. भगवती किल्ल्यावरील बाग विकसित करून ‘दुर्गरत्न’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ जलदुर्ग आणि १ गिरीदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती शास्त्रशुद्ध अभ्यास करून उभारणार आहे. सुमारे साडेचार कोटींचा हा प्रकल्प आहे. शासन आणि जिल्हा प्रशासनाने याला हिरवा कंदील दिला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर पावणेदोन वर्षात हा प्रकल्प तयार होईल. त्यामुळे शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्‍वास नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला. 

पालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पक्षिमित्र सुधीर रिसबूड, नगरसेविका रशिदा गोदड, बंटी कीर आदी उपस्थित होते. श्री. पंडित म्हणाले, ‘‘पालिकेने पर्यटन वाढीसाठी २०१७ मध्ये पर्यटन महोत्सव भरवला. पर्यटकांना व्हॅली क्रॉसिंग, बोटिंग, केव्हिंग, स्कुबा डायव्हिंग पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे शहरात पर्यटन वाढत आहे. सुधीर रिसबूड पक्षिमित्र आहेत, ते कातळशिल्पांचा 
शोध घेत आहेत. किल्ले, इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. त्यांनी किल्ल्यावर ‘दुर्गरत्न’ हा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.

भगवती किल्ला येथील दोन एकर जागेमध्ये असलेली बाग पडून आहे. त्या जागेत ७ जलदुर्ग आणि १ गिरीदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. यातून शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडला जाणार आहे. भक्कम तटबंदीवरून हा प्रकल्प पाहता येईल. किल्ल्यांचा इतिहास सांगणारे फलक लावले जाणार आहेत. पर्यटकांसाठी विश्रांतिगृह, खानपान आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. रात्रीदेखील या प्रतिकृती पाहता याव्यात, अशी रोषणाई केली जाणार आहे. बुरुजाचे प्रकार, आरमार आदींवर भर दिला जाणार आहे.

लहान मुलांसाठी झुलता पूल, भुयारी मार्गही यात असतील. ऐतिहासिक देखावेही तिथे असतील. यासाठी पुरातत्त्व विभाग व स्थानिक अन्य संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. साडेचार कोटींच्या या प्रकल्पाबाबतची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखविल्यानंतर त्यांनीही याला हिरवा कंदील दिला. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जिल्हा नियोजन किंवा पर्यटन विकास महामंडळाकडून साडेचार कोटींचा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- राहुल पंडित, 

नगराध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com