रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - एसटी कर्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या संपामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागला. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी एसटी विभाग नियंत्रकांना दिले.

रत्नागिरी - एसटी कर्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या संपामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागला. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी एसटी विभाग नियंत्रकांना दिले.

त्यानुसार एसटीच्या ३ हजार ६५० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात सुरू झाली. एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारा राज्यातील हा पहिला जिल्हा आहे. कायद्याचा बडगा उगारून संप चिरडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एसटी कामगारांनी दिली.

पोलिस खात्यानेही २० तारखेपर्यंत मनाई आदेश लागू केल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर चांगलाच दबाव आला आहे. जिल्हा प्रशासनाचे आदेश आणि पोलिसांच्या मनाई आदेशामुळे  एसटीच्या विभागीय कार्यालय व आगार परिसरासमध्ये जमलेल्या चालक, वाहक व अन्य कर्मचारी दुपारनंतर घरी परतले. एसटीचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. यामुळे दीपावलीच्या दिवशी जनजीवन विस्कळित झाले आहे. येथील मुख्य बसस्थानकात पूर्ण शुकशुकाट होता. एक वाहन किंवा प्रवासीही दिसत नव्हता. मात्र या बंदचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला आहे. एसटीच्या संपामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय झाली आहे. त्याच्या दळणवळणाचा प्रमुख प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

याबाबत एसटी विभागाप्रमुख अनघा बारटक्के यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आम्ही हजर न झालेल्या ३ हजार ६५० एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आलो आहे. संघटेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मी तक्रार दाखल करणार आहे, तर अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदविणार आहेत. 

महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते शिवसेनेचे आहेत. शिवसेनेची कामगार सेनाही संपात सहभागी झाली आहे. एसटी कामगार संघटना व इंटकने संपाची नोटीस दिल्यानंतर प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली नाही. संपात उतरण्याचा शिवसेनाप्रणीत कामगार सेनेचा निर्णय झाला नव्हता. रत्नागिरी जिल्ह्यात कामगार सेनेचे अनेक कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते संपात उतरले नसते तर थोडी वाहतूक सुरू राहिली असती. परंतु प्रदेश पातळीवर व स्थानिक नेत्यांनीही गांभिर्याने दखल घेतली नाही व अन्य कर्मचाऱ्यांसोबत सेनेच्या कार्यकर्त्यांनाही संपात उतरावे लागले. 

राजकीय पक्षांचे पूर्ण दुर्लक्ष
महिन्यापूर्वी कामगार संघटनेने बंदची हाक दिली होती. त्यानंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. परंतु प्रवाशांचे नुकसान होते म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाने साधी दखलसुद्धा घेतली नाही. सर्व जण दीपावलीचा आनंद लुटण्यात मग्न होते. सामान्य प्रवासी रिक्षा, दुचाकी, वडाप वाहतूक मिळेल त्या वाहनाने घर गाठावे लागले. भाजप-शिवसेना सत्तेत आहेत. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी प्रवाशांसाठीही काहीसुद्धा केले नाही, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत होत्या.

कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद
गेली अनेक वर्षे नोकरी करणारे चालक, वाहक बहुतांशी वेळा दीपावलीच्या दिवशी रात्रवस्तीच्या ड्युटीवर असतात. अभ्यंग स्नान, घरच्यांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेता येत नाही. संपाच्या निमित्ताने अनेक चालक, वाहकांना कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता आली.

महाराष्ट्रात सर्वत्र बंद सुरू आहे. रत्नागिरीतही सर्व कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. आमच्या संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरून रावते यांच्याशी चर्चा झाली. अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही करणार नाही. वरिष्ठांकडून निर्णय आल्यावर बंद मागे घेऊ.
- राजू मयेकर
रत्नागिरी विभाग अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

दोन दिवस झाले एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्याने सुमारे ५० लाखांचे महामंडळाचे नुकसान झाले.
- अनघा बारटक्के, रत्नागिरी विभाग नियंत्रक

वडापवाल्यांनी लुटले
संपामुळे वडापवाल्यांनी प्रवाशांकडून लाखो रुपये मिळवले. कोल्हापूरला जाण्यासाठी पाचशे ते हजार रुपये त्यांनी मागितले. शिवाय जवळच्या प्रवासाकरिताही अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. महत्त्वाचे काम, रुग्ण, दिवाळी याकरिता प्रवाशांनी मिळेल ते वाहन व मागेल ते पैसे या न्यायाने इच्छित स्थळ गाठले.