हापूस चारशे रुपये डझन, दर उतरण्याची शक्यता कमी

मुझफ्फर खान
मंगळवार, 24 एप्रिल 2018

चिपळूण - येथील बाजारात हापूस आंब्याचे दर 3 ते 4 हजार रुपये शेकडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हापूस आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. गेल्या आठवड्यात वादळ-वारे झाले. त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. त्यामुळे यावर्षी हापूसचे दर उतरण्याची शक्यता फारच कमी आहे. 

चिपळूण - येथील बाजारात हापूस आंब्याचे दर 3 ते 4 हजार रुपये शेकडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हापूस आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. गेल्या आठवड्यात वादळ-वारे झाले. त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. त्यामुळे यावर्षी हापूसचे दर उतरण्याची शक्यता फारच कमी आहे. 

येथील बागायतदार मार्च व एप्रिलमध्ये चांगल्या दर्जाचा हापूस मोठ्या बाजारपेठात पाठवतात. शेवटी तयार होणारा आंबा ते स्थानिक बाजारपेठेत विकतात. मात्र एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात चिपळुणात वादळी वारा झाला. त्यामुळे तयार हापूस गळून पडला. बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. चिपळुणातील व्यापारी, मुंबई, पुणेसह औरगांबाद, नाशिक, गुजरात, कर्नाटक या भागात हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात. या भागातून आंब्याची मागणी वाढली आहे, परंतु बागायतदारांकडे आंबा कमी आहे. आंब्याची निर्यात करताना स्थानिक बाजारपेठेपेक्षा चांगले पैसे मिळतात. त्यामुळे  बागायतदार जो आंबा शेवटच्या टप्प्यात स्थानिक बाजारपेठेत विकत होते, तोही आता निर्यात करण्याची शक्यता अधिक आहे.

पायरी, लालबाग, केशर, बदाम जातीच्या आंब्याचे दर तुलनेने कमी आहेत. चिपळुणातील गुहागर नाका, भेंडीनाका येथे हापूस आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. छोट्या-छोट्या कागदी बॉक्समध्ये गुलाबी कागदावर ठेवलेले आंबे जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. स्थानिक बाजारपेठेत सध्या जो आंबा उपलब्ध आहे तो 3 हजार रुपये शेकडा दराने विकला जात आहे. उच्च प्रतीच्या आंब्याचे दर चढे आहेत. सायंकाळनंतर या भागात आंबे खरेदी करण्यासाठी गर्दी वाढते.

यावर्षी मोहोर चांगला होता. फळधारणाही चांगली झाली होती. मात्र एप्रिलमध्ये निसर्गाने दगा दिला. तयार झालेला आंबा वार्‍यामुळे जमिनीवर पडला. त्याचा काहीच उपयोग करता येत नसल्यामुळे सर्वच मेहनत पाण्यात गेली. वर्षभर झालेला खर्चही निघणे कठीण आहे. आंबा निर्यात करून जे पैसे मिळतील त्यातच समाधान मानावे लागणार आहे. 

- मनोहर जाडे, पाचाड, ता. चिपळूण

 

Web Title: Ratnagiri News Hapus 400 Rupees Dozen