चिपळूणात चार अल्पवयीन मुलांकडून नशेच्या धुंदीत बसगाड्यांची नासधूस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

काविळतळी येथील चार अल्पवयीन मुलांनी नशेच्या धुंदीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांची नासधूस करून साहित्य चोरल्याचा प्रकार उघड झाला; मात्र ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार न देता पालकांना बोलावून समज देण्याचा चांगला निर्णय बसमालकांनी घेतला. पालकांच्या देखत एका मुलाने आपण गांजासेवन करत असल्याचे मोठ्या रुबाबात सांगितले, इतकी ही मुले निर्ढावली आहेत. 

चिपळूण - अफू, गांजा आदी अंमली पदार्थांना चिपळुणातील अल्पवयीन मुले बळी पडत आहेत. वारंवार असे प्रकार उघड झाल्याने चिंता वाढली आहे. काविळतळी येथील चार अल्पवयीन मुलांनी नशेच्या धुंदीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांची नासधूस करून साहित्य चोरल्याचा प्रकार उघड झाला; मात्र ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार न देता पालकांना बोलावून समज देण्याचा चांगला निर्णय बसमालकांनी घेतला. पालकांच्या देखत एका मुलाने आपण गांजासेवन करत असल्याचे मोठ्या रुबाबात सांगितले, इतकी ही मुले निर्ढावली आहेत. 

काविळतळी येथे जुन्या शालिमार हॉटेलशेजारी पडीक इमारत आहे. ही इमारत गर्दुल्यांचा जणू अड्डाच बनली आहे. गेले 15 दिवस 14 ते 18 वयोगटातील मुले या इमारतीजवळील दुकानातून सिगारेट विकत घेत. त्यामध्ये अफू, गांजा भरून इमारतीच्या बेसमेंटमध्ये नशा करीत बसत. नशेत किंवा विद्‌ध्वंसक वृत्तीने या इमारतीशेजारी उभ्या असलेल्या आलिशान बसगाड्यांची मोडतोडही सुरू होती. यामुळे तेथे पाळत ठेवण्यात आली.

तुषार गोखले यांच्या प्रवासी गाड्या या कंपाऊंडमध्ये उभ्या असतात. पलीकडून इमारतीमधून तेथे येऊन बसगाड्यांवर चढून टपावरून धावणे, गाड्यांचे साइड इंडिकेटर लाथेने फोडणे असा प्रकार मुले करत. सुरवातीला फांद्यानी गाड्यांचे इंडिकेटर फुटत असतील, असा संशय येऊन गोखले यांनी फांद्या तोडल्या. त्यानंतरही इंडिकेटर फुटण्याचे प्रकार सुरू होते.

धीर चेपलेल्या या मुलांनी मंगळवारी (ता. 24) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान गाडीत शिरून प्रथमोचाराचे साहित्य आणि जॅक, टॉमी चोरली. बसची नासधूस केली. परिसरातील लोकांनी याबाबतची माहिती गोखले यांना दिल्यानंतर बुधवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता गोखले व महेश दीक्षित यांनी पहारा केला. त्यावेळी एकाला पकडण्यात यश आले. त्याने अन्य तिघांची नावे सांगितली. गोखले यांनी चारही मुलांच्या पालकांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. झालेले नुकसान भरून देण्यास पालकांनी तयारी दर्शवली. 

आईला ठार मारण्याची धमकी 
तुषार गोखले यांनी त्या मुलांच्या पालकांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला. तेव्हा एकाच्या पालकांनी सांगितले की, पूर्वी आम्ही ज्या ठिकाणी राहात होतो तेथे आमचा मुलगा गांजा ओढत होता. त्याची ही सवय जाण्यासाठी आम्ही चिपळूणला आलो. अन्य एका मुलाने आपल्या पालकांसमोरच गांजा ओढत असल्याची कबुली दिली. पालकांपैकी एका आईने आपला मुलगा आपल्याला ठार मारण्याची धमकी देतो, असे सांगितले. 

ही मुले अल्पवयीन आहेत. गुन्हेगार नाहीत. त्यामुळे पोलिस कारवाई आम्ही केली नाही. त्यांना सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे. एका मुलाला पालक मारू लागले; तेव्हा मीच त्यांना थांबवले. पालकांना मुलांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे. पोलिस अधिकारी जानवे मॅडम यांनीही समुपदेशनाची तयारी दर्शवली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या मुलांपुढे पालक हतबल झालेले दिसतात. 
- तुषार गोखले, व्यावसायिक- चिपळूण