‘जलयुक्‍त’मधील कामांच्या जागा सॅटेलाईटद्वारे निश्‍चित

राजेश कळंबटे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी -  टंचाईग्रस्त गावे टॅंकरमुक्‍तीसाठी जलयुक्‍त शिवार योजना राबविली जात आहे. यामध्ये गावांमधील जागा निवडताना गोंधळ उडत असून अनावश्‍यक जागांवर बंधारे, नाले बांधण्याची कामे केली जात आहेत. त्याला आळा घालण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात गावे निवडताना सॅटेलाईटद्वारे ठिकाणे निश्‍चित केली जात आहेत.

रत्नागिरी -  टंचाईग्रस्त गावे टॅंकरमुक्‍तीसाठी जलयुक्‍त शिवार योजना राबविली जात आहे. यामध्ये गावांमधील जागा निवडताना गोंधळ उडत असून अनावश्‍यक जागांवर बंधारे, नाले बांधण्याची कामे केली जात आहेत. त्याला आळा घालण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात गावे निवडताना सॅटेलाईटद्वारे ठिकाणे निश्‍चित केली जात आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७२ गावांचे सॅटेलाईट नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यातील पन्नास गावांमधील कामांचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जलयुक्‍त शिवार अभियान उत्कृष्ट पद्धतीने राबविण्यासाठी कृषी विभागासह महसूल, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. २०१५-१६ ला पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्‍यातील पाच गावे निवडली होती. जिल्ह्यातील ४७ गावांचा ३९ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. टंचाईमुक्‍त राज्य बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती.

यामध्ये सीसीटी, सिमेंट व कच्चे बंधारे, गाळ काढणे, वृक्षलागवड, लुझ बोल्डर, गॅबियन बंधारे यासारख्या कामांचा समावेश केला होता. या कामांसाठी जागा निश्‍चित करताना संबंधित खात्याकडून चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा साठाच झालेला नाही. पावसाळ्यानंतर लगेचच बंधारे कोरडे राहिले. खेड, मंडणगड, दापोली तालुक्‍यातून शिवसेनेचे युवा नेते योगेश कदम यांनीही या कामात अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. त्या कामांची लाचलुचपत विभागाकडून चौकशीही सुरू आहे.

टंचाईग्रस्त गावे टॅंकरमुक्‍त करण्याच्या योजनेला भविष्यात गालबोट लागू नये, यासाठी शासनाने सॅटेलाईट सर्वेक्षण करून त्या-त्या गावातील जागा निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व जिल्हा कृषी विभागाला टॅंकरग्रस्त गावांची नावे कळविण्याचे आदेश दिले होते. पहिल्या दोन टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये जलयुक्‍तमधून कामे सुरू आहेत. आतापर्यंत ३७ कोटींची कामे पूर्ण झाली असून २३ कोटींची कामे शिल्लक आहेत. त्यातील पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कामे प्रगतिपथावर आहेत.

तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत टॅंकर सुरू असलेल्या गावांचा प्राधान्यक्रम ठरवून तिसऱ्या टप्प्यातील गावे निवड प्रक्रिया केली जाईल. सॅटेलाईटद्वारे ७२ गावांचे नकाशे तयार केले आहेत. त्या गावांमध्ये शिवारफेरीचे आयोजन केले जाणार आहे. त्यात सॅटेलाईटच्या नकाशातील जागांची पाहणी करून तिथे बंधारे किंवा तत्सम काम करणे शक्‍य आहे का याची तपासणी केली जाईल. त्यानंतर कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. सर्व गावांचा एकत्रित आराखडा करून निधीची मागणी केली जाणार आहे.

जलयुक्‍त शिवारमधील कामांचे सॅटेलाईट नकाशे तयार केले आहेत. शासनाच्या नियमानुसार तिसऱ्या टप्प्यातील गावांची निवड करण्यात येणार आहे.
- एस. एस. जगताप, जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक

Web Title: Ratnagiri News Jalyukta spot detection by satellite