बिबट्याने राखला मावशीचा मान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

देवरूख - भक्ष्याचा पाठलाग नडला आणि बिबट्या विहिरीत पडला. त्याने बहुधा मांजराचा पाठलाग केला. तेही विहिरीत पडले. रात्रभर दोघंही विहिरीतच होते. सहा तासांहून अधिक काळ विहिरीत पोहत दोघांनीही स्वतःचा जीव वाचवला. बिबट्याने मांजराला खाल्ले नाही आणि वाघाने मावशीचा मान राखला. दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

देवरूख - भक्ष्याचा पाठलाग नडला आणि बिबट्या विहिरीत पडला. त्याने बहुधा मांजराचा पाठलाग केला. तेही विहिरीत पडले. रात्रभर दोघंही विहिरीतच होते. सहा तासांहून अधिक काळ विहिरीत पोहत दोघांनीही स्वतःचा जीव वाचवला. बिबट्याने मांजराला खाल्ले नाही आणि वाघाने मावशीचा मान राखला. दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

ही घटना आज पहाटे उजगाव-सुतारवाडीत (ता. संगमेश्‍वर) घडली. जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या बिबट्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने जेरबंद केले. गेले सहा महिने परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात पकडल्याने उजगाववासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आज पहाटे पाचच्या सुमारास उजगाव-सुतारवाडीतील ग्रामस्थ विष्णू नारायण पांचाळ यांच्या घराशेजारीच मांजराच्या मागावर बिबट्या आला. मांजराला त्याचा अंदाज आल्याने त्याने धूम ठोकली. पळापळीत दोघेही विहिरीत पडले.

विहिरीत काहीतरी पडल्याचा अंदाज पांचाळ यांना आला; पण त्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी ७ वाजता या सार्वजनिक विहिरीवर वाडीतील मानसी आणि सानिका पांचाळ पाणी भरण्यासाठी गेल्या. तेव्हा आवाजामुळे त्यांनी विहिरीत पाहिले तेव्हा बिबट्या तरंगताना दिसला. त्यांनी सरपंच सुहासिनी पांचाळ, पोलिसपाटील प्रीतम बावधने, तंटामुक्त अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार यांना ही माहिती दिली. या सर्वांनी वन विभागाशी संपर्क साधला.

साखरपा गुरववाडीत लावलेला पिंजरा घेऊन परिक्षेत्र वनाधिकारी श्री. पाटील, वनपाल मुळ्ये, वनरक्षक आरेकर, गोसावी, देसाई, मांडवकर, कोळेकर आदी कर्मचारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला वर येण्यासाठी लोखंडी कॉट आत सोडण्यात आली. त्यानंतर पिंजरा खाली सोडण्यात आला. काही क्षणातच घाबरलेला बिबट्या प्रथम कॉटवर व लगेच पिंजऱ्यात घुसला. अवघ्या ३० मिनिटांत बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात सर्वांना यश आले. त्यापाठोपाठ आत मांजरही जिवंत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यालाही वर काढण्यात यश आले.

बिबट्या सहा फूट लांबीचा
हा नर बिबट्या ६ फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला आहे. बिबट्याला वर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला सहकार्य केले. गेल्या तीन महिन्यांत संगमेश्वर तालुक्‍यात बिबट्या सापडण्याची ही पाचवी वेळ आहे. दोन बिबटे मृत झाले, तर दोघांना सुरक्षित जंगलात सोडून देण्यात आले. या बिबट्यालाही चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

ओंडक्‍याचा आधार
बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच विहिरीभोवती गर्दी वाढली. आतमध्ये बिबट्या मोठ्या पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होता. त्याला पाहण्यासाठी गर्दी वाढली असतानाच विहिरीवरील एक लाकडी ओंडका तुटला आणि तो खाली पडला. याच तुटलेल्या ओंडक्‍याच्या आधारावर बिबट्या शेवटपर्यंत तरंगत राहिला. बुडत्याला काडीचा तसा बिबट्याला ओंडक्‍याचा आधार मिळाला.

Web Title: ratnagiri news leopard in Uchagaon