कातळावरील आंबा कलमे मोहोरली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - परतीच्या पावसाचा जोर उशिरापर्यंत होता; मात्र दिवाळीच्या तोंडावर विश्रांती घेतल्याने धास्तावलेल्या बागायतदारांना दिलासा मिळाला. ‘ऑक्‍टोबर हीट’मुळे तालुक्‍यातील पावस पंचक्रोशीत बागांमधील कलमांना मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.

रत्नागिरी - परतीच्या पावसाचा जोर उशिरापर्यंत होता; मात्र दिवाळीच्या तोंडावर विश्रांती घेतल्याने धास्तावलेल्या बागायतदारांना दिलासा मिळाला. ‘ऑक्‍टोबर हीट’मुळे तालुक्‍यातील पावस पंचक्रोशीत बागांमधील कलमांना मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.

कातळावरील बागांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे संकेत या वर्षी हंगाम चांगला येण्याचे आहेत, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे. आता बागायतदारांना थंडीची प्रतीक्षा आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस पडेल अशी शक्‍यता आहे; मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. सप्टेंबरअखेरीस आणि ऑक्‍टोबरच्या सुरवातीला पावसाने जोरदार दणका दिला. त्यानंतर दिवसभर चांगले ऊन पडत आहे. आंबा बागांच्या मुळातील पाणी उष्णतेमुळे लवकर मुरले. त्यामुळे पालवी लवकर येऊन मोहोराची फूट होईल. खूप सूर्यप्रकाश असेल तर कातळातील झाडांच्या मुळातील पाण्याचा लवकर निचरा होतो. ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी उत्तरेकडील बोचरे वारे सुरू होणे आवश्‍यक आहेत. हे वातावरण समाधानकारक राहिले तरच त्याचा फायदा आंबा हंगामाला होईल.

नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी पडली पाहिजे. या कालावधीत पाऊस पडला तर बहुतांश कलमांना पालवी फुटेल आणि मोहोराची फूट लांबणीवर पडेल. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील हवामानावर पुढील आडाखे बांधावे लागणार आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये परतीचा पाऊस झाला की लगेचच कातळावरील कलमे मोहोरू लागतात. हा मोहोर टिकला तर त्याचा फायदा बागायतदारांना मिळतो. बाजारात दरही चांगला मिळतो. हे गणित पावसावर अवलंबून राहते.

एक हजार कलमे असलेल्या बागेत २० ते २५ झाडांना मोहोर आला आहे. हे दिलासादायक चित्र आहे. चांगल्या हंगामाची चाहूल मिळत असून आता फक्‍त भविष्यात वातावरणाची साथ मिळाली पाहिजे.
- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार