मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 15 जूननंतर थांबणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात त्यात भर पडू शकते. जिल्हा प्रशासनाने १५ जूननंतर पावसाळा संपेपर्यंत डोंगर कटिंगची कामे बंद ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. महामार्गावरील २२ दरडप्रवण ठिकाणांसह जुन्या पुलावर लक्ष ठेवणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी घोरपडे यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत हे निर्णय झाले. चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सपाटीकरणासाठी झाडे तोडली. जीसीबीने डोंगर कापले आहेत. त्याची माती रस्त्याच्या बाजूला आहे. पावसाळ्यात ती रस्त्यावर येऊन अपघात होऊ शकतात. काही ठिकाणी रस्ता खचण्याचीही भीती आहे. 
काही दिवसांत पावसामुळे गाड्या घसरून अपघात झाले. यावर उपाय म्हणून रस्त्याच्या बाजूला असलेली माती काढून टाकणे, धोक्‍याच्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधणे, गटारे व्यवस्थित करणे, वहाळ स्वच्छ करणे अशा सूचना दिल्या आहेत.

रस्त्यावरील खड्डे भरणे व दरडप्रवण भागावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. माती रस्त्यावर आल्यास आवश्‍यक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूल, साकवांचे सर्व्हेक्षण करून त्यांची दुरुस्ती केली जाईल. कशेडी, परशुराम, भोस्ते, निवळी यासह बावीस दरडप्रवण भागात  बांधकाम विभाग लक्ष ठेवणार आहे. तिथे संरक्षक कठडे बांधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आरवली ते निवळी मार्गावरील बाजूपट्ट्या मजबूत नाहीत. बाजूपट्ट्यांची दुरुस्ती होणार असून याचा आढावा पुन्हा जिल्हाधिकारी घेणार आहेत.

Web Title: Ratnagiri News Mumbai-Goa four track highway work