रिफायनरी रद्दची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

राजापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची मागणी करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सागवे येथे केले. 

राजापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची मागणी करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सागवे येथे केले. 

ते म्हणाले, ‘‘हा प्रकल्प संपूर्ण कोकणाला उद्‌ध्वस्त करणारा आणि घातक कसा आहे, हे त्यांना पटवून देऊ.’’ प्रकल्पविरोधी लढ्यात तुम्ही एकटे नसून, आम्ही तुमच्याबरोबर असल्याचा निर्वाळा देत प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला बळ दिले. ‘नाणार रिफायनरी’विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर हल्लाबोल करताना त्यांनी आव्हान दिले, की सत्तेत असूनही वारंवार ‘रिफायनरी’विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने रिफायनरी रद्द करून दाखवावी. 

येत्या चार दिवसांत मुंबईत मोठी उद्योजक परिषद होत आहे. त्या परिषदेत रिफायनरीसंदर्भात करार होणार आहे. त्या करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई स्वाक्षरी करणार आहेत. एका बाजूला शिवसेना प्रकल्पाला विरोध म्हणून सांगते; मग शिवसेनेचे मंत्रीच या करारावर स्वाक्षरी कशी करणार आहेत?
- नीतेश राणे,
आमदार

तालुक्‍यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सागवे येथे जाहीर सभा झाली. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, राजन देसाई, सिंधुदुर्गचे दत्ता सामंत, ‘स्वाभिमान’चे तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे आदी उपस्थित होते. 

या वेळी श्री. राणे यांनी घातक रिफायनरीमुळे संपूर्ण कोकण उद्‌ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांवर प्रशासनाकडून झालेला अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देताना प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांच्या भावना समजून घ्याव्यात, असे मतही त्यांनी या वेळी मांडले.

कोकणावर झालेला अन्याय कधीही खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देताना आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही दिली. एका बाजूला सत्तेत राहायचे, शिवसेनेच्या मंत्र्यांना रिफायनरीचा अध्यादेश काढायचा आणि दुसऱ्या बाजूला प्रकल्पाला विरोध असल्याचे जाहीर करायचे, या भूमिकेवर श्री. राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशा टिप्पणीही त्यांनी केली. पंधरा दिवसांत प्रकल्प रद्द करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, अडीच महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अद्याप प्रकल्प रद्द का झाला नाही, असा खोचक सवालही त्यांनी केला. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, त्या कोकणाला शिवसेनेने काय दिले, असा सवालही केला. शिवसेनेने प्रकल्प रद्द करून दाखवावा, असे आव्हानही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रिफायनरी आणल्याच्या खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना ज्यांना नाणार कुठे आहे, हे माहिती नाही ते प्रकल्प कसा आणतील, असा प्रश्‍नही उपस्थित केला. 

या वेळी माजी खासदार डॉ. राणे, आमदार राणे यांनी मनोगत व्यक्त केले. कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. वालम, रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष मजीद भाटकर, नंदकुमार कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना रिफायनरी रद्द करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा प्रकल्पविरोधी लढा प्रशासनाकडून दाबला जाताना त्याद्वारे प्रकल्पग्रस्तांवर कसा अन्याय केला जात आहे, याची माहितीही मनोगताद्वारे दिली. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Narayan Rane Comment