लाल मातीतील नाचणीचा आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार गौरव

लाल मातीतील नाचणीचा आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार गौरव

खेड -  कोकणातील नाचणीचा आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उदो होणार असून, यासाठी नुकतीच रोम मधील एका शिष्टमंडळाने खेड तालुक्‍यातील आंबये गावात भेट दिली. तेथील महिला बचत गटांनी एकत्र येत सुमारे साठ एकर क्षेत्रावर नाचणीचे उत्पादन घेतले आहे. या बचत गटांनी पांढरी व लाल नाचणी पिकवली. सहकाराचा हा मंत्र गेली तीन वर्षे या महिला जपत आहेत. 

२००८ पासून महिला आर्थिक विकास योजनेतर्गंत तेजस्वीनी योजना सुरू करण्यात आली. तालुक्‍यात लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत सुमारे अडीचशे बचत गट आहेत. आंबयेतील महिलांना एकत्र आणून सर्व सहयोगिनींनी विशेष मेहनत घेतली.

इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, एक्‍सेल कंपनी पुरस्कृत विवेकानंद रिसर्च सेंटर आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे साह्य लाभले. २०१४-१५ ला महिलांनी एक एकरात शेती केली. त्यावेळी पारंपरिक पद्धत व गावठी बियाणे वापरले. 
तेव्हा एक बचत गट सहभागी झाला. शेतीतून त्यांना फायदा झाला. त्यानंतर त्यांनी सलग दोन वर्षे साठ एकर क्षेत्रावर दापोली नं.१ जातीचे बियाणे वापरले.

पांढरी व लाल नाचणी पिकवण्यात आली. तयार नाचणीला बाजारपेठेचा प्रश्‍न होता. त्यावेळी एक्‍सेल इंडस्ट्रीज आणि विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुढे झाली. नाचणीपासून विविध उपपदार्थ बनवण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. एक्‍सेलचे अधिकारी सुरेश पाटणकर यांनी पुढाकार घेतला. आंबये बुरूमवाडी येथे नाचणीचे पौष्टिक सत्त्व तयार करण्याचे युनिट उभारण्यात आले. या महिलांना विद्यापीठाने प्रशिक्षण देऊन नाचणीपासून विविध पदार्थ बनवण्यास शिकवले. त्यामुळे गतवर्षी दीपावलीत या महिलांनी नाचणीपासून बनवलेला फराळ परदेशात गेला. रोमशी संपर्क असा आला. त्याची दखल घेऊन इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे अधिकारी श्री. स्टिफन आणि श्रीमती. जेनिफर यांनी या आंबयेला भेट दिली. हे दोघेही आंतरराष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये या सामूहिक शेतीची माहिती देणार आहे. त्यांनी पांढऱ्या नाचणीवर संशोधन करण्याची हमी आहे. येथे वापरलेले बियाणेही त्यांनी सोबत नेले. 

एक्‍सेलचे विशेष सहकार्य
कोकणात नाचणी, वरी, हरीक ही पिके लुप्त होत आहेत. डोंगराळ भागासह समतल ठिकाणीही ती घेता येतात. त्यातून शरीराला आवश्‍यक असे घटक पदार्थ (प्रोटिन्स) मिळत असतात. परंतु सद्यःस्थितीत कोकणातील शेतकरी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या पिकांना नवसंजीवनी मिळून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा, त्यांनी तयार केलेल्या पिकाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्यातून बायोप्रोडक्‍टची निर्मिती व्हावी म्हणून एक्‍सेल कंपनी व विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काम करत आहे, अशी माहिती सुरेश पाटणकर यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com