चिपळूण शहरातील शाळेचे स्थलांतर अन्‌ ५ कोटींची जमीन

चिपळूण शहरातील शाळेचे स्थलांतर अन्‌ ५ कोटींची जमीन

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिपळूण शहरातील चिंचनाका येथील जिल्हा परिषद शाळा स्थलांतराच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. न्यायालयाचा अवमान करून शाळेच्या जागेचे खरेदीखत झाल्याचा आरोप होतो आहे. शालेय आवारातील बांधकाम तोडूनही कारवाई झालेली नाही. त्यातच शहरात अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेला आटापिटा, यामध्ये राजकीय पदाधिकारी व काहीजणांचे गुंतलेले हितसंबंध, शाळा स्थलांतरास पालक, शालेय व्यवस्थापन समितीचा विरोध, न्यायालयाने दिलेला निकाल, या साऱ्यामध्ये जिल्हा परिषद नेमकी कोणती भूमिका घेणार याची शहरवासीयांना उत्सुकता आहे. शहरातील मोक्‍याच्या ठिकाणची १४ गुंठे जागा शाळा स्थलांतरित झाल्यावर मोकळी होणार आहे. बाजारभावाने आज या जागेची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षण यापेक्षा आर्थिक हितसंबंधाचीच चर्चा अधिक होते आहे. 

ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा
जागा मालक पांडुरंग सदाशिव बापट व अन्य जणांनी पालिकेस शाळेसाठी जागा दिली होती. ९९ वर्षांचा करार तसेच शाळा सुरू असेपर्यंत ही जागा देण्याचा करार झाला होता. सध्या या शाळेस १३१ वर्षे झाली आहेत. लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधर टिळक हे याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शासकीय दप्तरी देखील त्याची नोंद आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या चिंचनाका येथील ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये सुरू असलेली शाळा आहे तेथेच राहावी, असा पालकांचा आग्रह आहे.

लोकल बोर्ड मराठी शाळा म्हणून नोंद
चिपळूण पालिकेकडे लोकल बोर्ड मराठी शाळा अशी नोंद आहे. याच नावाने शाळेचा कर जमा केला जातो. येथील सुमारे १४ गुंठे जागेपैकी २.३० गुंठे जागा शाळेच्या नावे आहे. जिल्हा परिषद अस्तित्वात येण्यापूर्वी लोकल बोर्ड कार्यरत होते. २.३० गुंठे जागा सातबाऱ्याला नोंद आहे.

चिपळूणसह जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव लाल फितीत अडकले आहेत. चिंचनाका येथील जिल्हा परिषद शाळा धोकादायक ठरविली. हा निकष जिल्ह्यात लागू केल्यास ५० टक्के शाळा स्थलांतरित कराव्या लागतील. जि. प.ने शाळा स्थलांतराचा हेतू जाहीरपणाने स्पष्ट करायला हवा. स्थलांतरासाठी पालक, व्यवस्थापन समितीलाही विश्‍वासात घ्यावे. 
- सौ. पूजा निकम, सभापती, पंचायत समिती चिपळूण

करार संपल्याने जागा मालकाची मागणी
शाळा इमारतीबाबत केलेला ९९ वर्षांचा करार संपुष्टात आला. तसेच १३१ वर्षाची जुनी इमारत धोकादायक झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांविषयी चिंता सुरू आहे. जागा परत मिळण्याची मागणी मूळ मालक पांडुरंग बापट यांनी पालिकेकडे केली होती. त्यानुसार २७ जुलै २०१६ च्या सभेत जागा मूळ मालकास देण्याचा ठराव झाला. श्री. बापट हे जागेचे मालक आहेत. मात्र त्यांना जागेचा ताबा देता येणार नाही. असा निकाल खेड जिल्हा न्यायालयाने २००७ मध्ये दिला होता. त्यानंतरही या जागेचे खरेदीखत झाले, असा आरोप केला जात आहे. 

मोक्‍याची जागा
शहराच्या मुख्य चिंचनाक्‍याला लागून ही शाळेची जागा आहे. या जागेस दोन्ही बाजूंनी रस्ते असल्याने सुमारे ३५ लाख रुपये गुंठा बाजारभाव आहे. करार संपल्यानंतर या जागेचे खरेदीखत झाले. मात्र शाळा सुरूच राहिल्याने संबंधितांना ही जागा विकसित करता आलेली नाही. परिणामी धोकादायक असलेल्या या शाळेचे स्थलांतर व्हावे. यासाठी राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक थोडे अधिक प्रयत्नशील आहेत. कन्याशाळेत या शाळेचे स्थलांतर होण्यासाठी तेथील नादुरुस्त असलेली शाळा लोकसहभागातून दुरुस्त करण्याचे पुढाकार घेणाऱ्यांचे नियोजन आहे.

गेल्या काही वर्षांत शाळेची पटसंख्या सुधारत असून शैक्षणिक गुणवत्ता देखील वाढती आहे. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य, भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. ब्रिटिशकालीन इमारत सुस्थितीत असल्याने आम्ही शाळा स्थलांतरास विरोधाचा ठराव केला आहे.
- भगवान साळवी, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

स्थलांतरास शालेय व्यवस्थापन समितीचा विरोध
शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगली आहे. शैक्षणिक उठावातून विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. . इमारतीचा कोणताही भाग खचलेला नाही. भिंतीचा भागही निखळलेला नाही. इमारत सुस्थितीत असून विद्यार्थ्यांना कोणताही धोका संभवत नाही. असा दावा करून स्थलांतर न करण्याचा ठराव शालेय व्यवस्थापन समितीच्या गत वर्षाच्या बैठकीत झाला होता. नगरसेविका सौ. नूपुर बाचिम यांनी सुचवलेल्या ठरावास अध्यक्ष भगवान साळवी यांनी अनुमोदन दिले होते.

शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रमावर भर
शाळेत ई-लर्निंगची सुविधा आहे. प्रत्येक वर्गात संगणक असून विद्यार्थी त्याचा नियमित वापर करतात. लोकसहभागातून शाळेस आवश्‍यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा आहेत. लोकसहभागातून झालेल्या रंगरंगोटीमुळे शाळेचा लुक बदलला आहे. रेल्वे अधिकारी, खासगी कंपन्यांचे अधिकारी, कार्यरत असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची मुलेही याच शाळेत आहेत. तालुक्‍यातील कामथे, खांदाटपाली तसेच शहरातील मुलेही येथे शिक्षण घेतात.  

मालकी असल्याने जागा विकसित करण्याचे प्रयत्न
पालिकेने भाडेकरारावर जिल्हा परिषदेला जागा दिली होती. गेल्या १२५ वर्षात पालिका अथवा जिल्हा परिषदेने इमारतीच्या डागडुजीवर खर्च केलेला नाही. परिणामी मोडकळीस आलेल्या इमारतीचा विद्यार्थ्यांना धोका असल्याचे पालिकेने जिल्हा परिषदेस कळवले होते. श्री. बापट यांच्याकडून सुमुख पातकर यांनी २६ ऑगस्ट २०१६ ला ही जागा खरेदी केली. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चाही केली होती. या जागेची मोजणी करावयाची असल्याने वापरात नसलेले शौचालय जेसीबीच्या साह्याने पाडले. यापुढे रितसर परवानगी आणल्याशिवाय जागेत मोडतोड करणार नाही. असा जबाब मालक सुमुख पातकर यांनी २३ नोहेंबर २०१६ ला पोलिस ठाण्यात दिला होता, अशी माहिती तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com