कोकणातील शिमगोत्सव, यात्रा जगाच्या नकाशावर

कोकणातील शिमगोत्सव, यात्रा जगाच्या नकाशावर

रत्नागिरी - कोकणातील शिमगोत्सवासह यात्रांची माहिती जगाच्या नकाशावर यावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) वेबसाईटचा पर्याय सर्वांसाठी खुला केला आहे. पारंपरिक महत्त्व असलेले सण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले तर त्यातून पर्यटनवृद्धी होईल, असा विश्‍वास एमटीडीसीचे अधिकारी जगदीश चव्हाण यांनी व्यक्‍त केला.

कोकणात थोड्याच दिवसात शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे. दहा ते पंधरा दिवसांच्या या सणाचे महत्त्व गावागणिक वेगळे असते. गावातील देवाची पालखीला रूपं लावण्यापासू ती घरोघरी नेण्यापर्यंतच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत. हा सण साजरा करण्याची आणि देवाला गाऱ्हाणं घालण्याची परंपरा आहे. या जुन्या परंपरा, सण-उत्सव साजरा करण्याच्या पद्धती अनेक लोकांपर्यंत पोचतच नाहीत.

सध्या एमटीडीसीनेही शासनाच्या वेबसाईटला नवा आयाम दिला आहे. कोकणातील सर्वच पर्यटनस्थळे, तेथील व्यवस्था, काय पाहता येईल याची माहिती त्या वेबसाईटवर पाहायला मिळेल अशी सुविधा केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आयोजित करण्यात येत असलेले महोत्सव याची माहिती देणारा ‘व्हॉटस्‌ न्यू’ हा पर्याय ठेवला आहे. त्यात कार्यक्रमाचे नियोजन, माहिती दिलेली असते. याचा आधार घेऊन पर्यटक त्या ठिकाणाला भेट देतील, असा त्या मागील उद्देश आहे.

दिल्लीचे पर्यटक रत्नागिरीत
महाराष्ट्राबाहेरील पर्यटक कोकणात यावेत यासाठी एमटीडीसीने परराज्यात किंवा मोठ्या शहरांमध्ये आयोजित केलेल्या महोत्सवात पर्यटनस्थळांची माहिती देणारे स्टॉल बचत गटांसाठी ठेवले होते. त्यात दापोली आणि रत्नागिरीतील काही लोकांनी सहभागही घेतला होता. त्यामुळे दिल्लीसह अन्य काही राज्यांतील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्याचा दावा एमटीडीसीकडून करण्यात आला आहे.

कोकणातील शिमगोत्सवांना, यात्रांना आगळेवगेळे महत्त्व आहे. त्यांची महती सर्वदूर पसरलेली आहे; मात्र त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठी एमटीडीसीकडून पावले उचलण्यात येत आहेत. गणपतीपुळ्यात अंगारकीच्या निमित्ताने अनेक भक्‍तगण तेथे गर्दी करतात. त्याचप्रमाणे संगमेश्‍वरातील शिंपणे, सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीची यात्रा, मार्लेश्‍वरची यात्रा यासह विविध उत्सवांची माहिती या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे शक्‍य आहे.

संबंधित ठिकाणच्या लोकांनी एमटीडीसीकडे संपर्क साधून ती माहिती कार्यालयात उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचा सविस्तर इतिहास, परंपरा आणि कालावधी वेबसाईटवर प्रसिद्ध करता येणार आहे. एमटीडीसीच्या या वेबसाईटला आतापर्यंत १५ लाख २७ हजार ३५० लोकांनी भेटी दिल्या आहेत. या वेबसाईटवरून अनेक पर्यटन स्थळांचे आरक्षणही केले जाते. कोकणातील परंपरा देशाच्या नव्हे, तर सातासमुद्रापार पोचवण्याची संधी एमटीडीसीने दिली असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com