गावगुंड होते म्हणून भाजपचे पाच तरी नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

देवरूख - सेनेचे गावगुंड होते म्हणूनच भाजपचे ५ तरी नगरसेवक निवडून आले, येत्या निवडणुकीत ते पण येणार नाहीत, गुंडगिरी कोण करतेय हे आधी आपल्या पक्षात पाहा आणि मग आम्हाला सल्ले द्या, देवरूखवासीय सुज्ञ आहेत. फुसके बार सोडणाऱ्यांना आणि विकासाच्या नावाखाली मलिदा लाटणाऱ्यांना येत्या निवडणुकीत देवरूखकर घरी बसवतील, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.

देवरूख - सेनेचे गावगुंड होते म्हणूनच भाजपचे ५ तरी नगरसेवक निवडून आले, येत्या निवडणुकीत ते पण येणार नाहीत, गुंडगिरी कोण करतेय हे आधी आपल्या पक्षात पाहा आणि मग आम्हाला सल्ले द्या, देवरूखवासीय सुज्ञ आहेत. फुसके बार सोडणाऱ्यांना आणि विकासाच्या नावाखाली मलिदा लाटणाऱ्यांना येत्या निवडणुकीत देवरूखकर घरी बसवतील, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.

नगरपंचायतीवरील सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या द्वितीय वर्षपूर्ती मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी शिवसेनेला बाजूला ठेवले म्हणून देवरूखचा विकास झाला, असे वक्‍तव्य केले होते. तसेच माने यांनी शिवसेनेला गावगुंड अशी उपमा दिली होती. या वक्‍तव्याचा समाचार घेताना नगरसेवक व माजी सभापती बंड्या बोरुकर, माजी उपनगराध्यक्ष मनिष सावंत, पं.स. सदस्य छोट्या गवाणकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 
देवरूखच्या पहिल्या निवडणुकीत यांची उमेदवार उभे करण्याची ताकद नव्हती. जे पाच नगरसेवक निवडून आले आहेत त्यातले तीन उमेदवार आम्ही पुरवले आहेत. हिंम्मत असेल तर येत्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर १७ उमेदवार उभे करून दाखवावेत. कोण किती पाण्यात हे तेव्हाच ठरेल असे आव्हान या सर्वांनी दिले.

आमची संभावना गावगुंड अशी केलीत मात्र हे गावगुंड होते म्हणूनच तुमचे ५ तरी नगरसेवक निवडून आले. पहिली अडीच वर्षे आमच्याबरोबरच होतात. मात्र काही खायला मिळाले नाही म्हणून सत्तेच्या हाव्यासापोटी काँग्रेस-राष्ट्रवादीची कास धरलीत. संख्याबळाच्या आधारावर तुमची बाजी झाली खरी पण येत्या निवडणुकीत ही जनताच तुमचे संख्याबळ झिरो करणार आहे हे भाजपवाल्यांनी लक्षात ठेवावे, असा बोचरा सल्ला त्यांनी दिला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने हे विधानसभेला निवडून येत नाहीत, त्यांना स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषदेतही निवडून आणता येत नाही, गावची ग्रामपंचायत ताब्यात घेता येत नाही, त्यांना आता विजयी असा टिळा लावायचा असेल तर त्यांनी येत्या नगरपंचायत निवडणुकीत मधलीआळीतून निवडणूक लढवावी आणि देवरुखातून विजयी होण्याचा मान मिळवावा, असेही त्यांनी सुनावले.

सहा पक्षांच्या मेळाव्यात दोनशे हजर
दोन वर्ष झाली म्हणून सहा पक्षांचा मेळावा घेतात आणि समोर फक्‍त दोनशे माणसं दिसतात हाच यांचा विकास असल्याचा टोला लगावत, ज्यांच्या जीवावर सध्या सत्ता उपभोगताय ते आता कुठे आहेत याचा विचार भाजपने करावा आणि मगच शिवसेनेच्या नादाला लागावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.