फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतल्यास ‘स्काय इज द लिमिट’ - श्रीकांत मलुष्टे

मकरंद पटवर्धन
रविवार, 13 मे 2018

फोटोग्राफीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले तर जगात कुठेही फोटोग्राफी करताना ‘स्काय इज द लिमिट’ असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी केले.

रत्नागिरी - डिजीटल कॅमेरा हे वरदान आहे. पण त्याचा उपयोग अनेक तर्‍हेने करता येतो. फक्त लग्नसमारंभ म्हणजे फोटोग्राफी नव्हे तर मराठी फोटोग्राफर्सनी जाहिरात, आर्किटेक्चर, इंटेरिअर, क्रूझ, चाईल्ड, इंडस्ट्रीयल, वाइल्ड लाईफ अशा अनेक प्रकारच्या फोटोग्राफीकडे वळले पाहिजे. फोटोग्राफीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले तर जगात कुठेही फोटोग्राफी करताना ‘स्काय इज द लिमिट’ असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी केले.

श्री. मलुष्टे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, प्रोफेशनल फोटोग्राफी करताना आयुष्य अपुरं पडेल एवढ्या संधी येतात. संगणकावर फोटोमध्ये काहीही किमया साधता येत असली तरी बरेचसे फोटोग्राफर कॅमेर्‍याच्या वेगवेगळ्या भागाची उपयुक्तता व माहिती नसल्याने फोटो चांगल्या रितीने काढू शकत नाहीत. भरपूर प्रकाश किंवा स्टुडिओ सेटअप लावून फोटोग्राफी करण्यापेक्षा प्रकाश-अंधाराचा खेळ आपल्या फोटोत आला पाहिजे, तेव्हा तो फोटो आवडतो.

ज्या तर्‍हेने सेल्फी टिपण्यात गुंतलेले असल्याने फोटोग्राफी हा छंद आता जनमानसात झपाट्याने पसरलेला आहे. फोटोग्राफीतून पैसा मिळत असला तरी त्याहीपेक्षा भरपूर आनंदही मिळतो. अलीकडे कँडीड म्हणजे सहज, सुलभ फोटो काढले जातात. लग्न लागल्यानंतर वधु-वर नवे कपडे परिधान करण्यासाठी जातात. त्या वेळी तास-दीड तासामध्ये हॉलमधील सर्व मंडळी अनेक दिवसांनंतर भेटल्याने गप्पा, जेवणाचा आनंद घेत असतात. अशा वेळी काढलेले सहज फोटो कोणालाही आवडतीलच. हे खरे बोलके फोटो असतात, असे प्रा. मलुष्टे यांनी सांगितले.

चाईल्ड फोटोग्राफी हे चॅलेंज आहे. तुम्ही त्या मुलाच्या समोर जा, झोपा आणि त्याच्या हावभाव टिपा. त्यांच्यासारखे हावभाव कोणीच करू शकत नाही. त्यामुळे जाहिरातींमध्ये मुलांना भरपूर संधी मिळत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा, असेही मलुष्टे यांनी सांगितले.

फोटोग्राफी ही कला काळजाला हात घालणारी आहे. त्यातला आशय व भावना हृदयाला भिडणार्‍या हव्यात. संगीताप्रमाणे या कलेचाही रियाज करावा लागतो. फोटो काढण्याचा व्यासंग हवा.

- प्रा. श्रीकांत मलुष्टे

Web Title: Ratnagiri News Shrikant Malushte Press