संपात भरडलेल्यांसाठी उजळले माणुसकीचे दीप

राजेश शेळके
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेल्या संपात प्रवाशांबरोबर खुद्द एसटी कर्मचारीही भरडले गेले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरील सुमारे साठ ते सत्तर एसटी चालक, वाहक येथे अडकून पडले आहेत. त्यांच्या खान-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र आपल्या बांधवांचे हाल लक्षात आल्यावर येथील महिला वाहकांनी त्यांना जेवू घातले. वाहक भगिनींनी माणुसकीच्या संपाच्या या तमातही या कर्मचारी उजळून निघाल्या.  या भगिनींच्या आगळ्या दिवाळी भेटीमुळे रखडलेले आणि दूरवर घरे असलेले हे कर्मचारी गहिवरले. 

संपाच्या दुसऱ्या दिवसाचा कानोसा घेतला असता वेगळाच प्रकार पुढे आला. प्रवासीच नाही, तर संपात एसटी चालक, वाहकदेखील होरपळले आहेत. कर्नाटक, बेळगाव, मिरज, कोल्हापूर, सावंतवाडी, सातारा, सोलापूर, पंढरपूर आदी भागांतील लांब पल्ल्याच्या गाड्या सोमवारी (ता. १६) रात्री आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्या परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वीच संप पुकारल्याने हे कर्मचारी अडकून पडले आहेत. कोणतीही पूर्वतयारी नसल्याने त्याच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला. सुमारे साठ ते सत्तर चालक, वाहकांचा यात समावेश आहे. त्यांनी राहण्याचा व्यवस्था होत नसल्याने एकत्रित राहण्यासाठी स्वतंत्र हॉलचीही पाहणी केली. परंतु तो त्यांना उपलब्ध झाला नाही. 

चालक, वाहकांची अडचण स्थानिक महिला वाहकांच्या लक्षात आली. ऐन दिवाळीत त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याने या बहिणींना पाझर फुटला. माणुसकीच्या नात्यांनी स्वतः या महिलांनी आज दुपारी शेगड्या, मोठी पातेली असे साहित्य आणून त्यांनी या चालक, वाहकांना जेवण-पाण्याची व्यवस्था केली. महिला वाहकांच्या या पुढाकारामुळे स्थानकात रखडलेल्या कर्मचाऱ्यांना जणू भगिनी भेटल्याचा अनुभव आला. 

मदतीचे समाधान
संपामध्ये एसटी विभागातील लांब पल्ल्याच्या चालक, वाहकांचा खान-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ऐन दिवाळीत त्यांच्यावर ही वेळ आली. माणुसकी म्हणून आम्ही पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी जेवण केले. सुमारे साठ ते सत्तर चालक, वाहकांना आज जेवू घातले. त्याचा थोडा त्रास झाला, परंतु मानसिक समाधान मिळाले, असे विजया खैरे, सौ. मनाली साळवी, प्रियांका पवार आदी भगिनींनी सांगितले.