कुणी तरी आहे तिथं -रहस्य राखण्यात यशस्वी

कुणी तरी आहे तिथं -रहस्य राखण्यात यशस्वी

मानवी जीवन सगळ्या भावभावनांच्या आधार असलेल्या मनावरच तर विसंबून आहे. समाजात स्वार्थाने आणि निःस्वार्थीपणाने जगणारी माणसं असतात. मात्र, कधी न कधी मालमत्ता पाहून माणूस लालची होतो. हेतू साध्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. स्वार्थ, लालचीपणाने सर्वच मिळतं असं नाही. लेखक सुरेश खरे यांनी लालचीपणावर भाष्य करणारी ‘कुणी तरी आहे तिथं’ ही संहिता दिग्दर्शक अमोल रेडीज यांनी नाटकातील सस्पेन्स कायम ठेवत रंगवली. राज्य नाट्य स्पर्धेत नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळ, पाली या संस्थेचा प्रयोग रसिकांना भावला. नाटकातील सस्पेन्स अभियनयातून रंगवणाऱ्या नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेतील अत्यंत सुंदर जुन्या संहितेची कलाकृती रसिकांच्या मनावर बिंबविण्यात संस्था यशस्वी झाली.

काय आहे नाटक ?
नाटकातील नायक ॲड. प्रधान सरदार शिवाजीराव जगताप यांच्या वाड्यात वीस वर्षानंतर येतात. जगतापांनी मरणापूर्वी लिहिलेल्या मृत्यपत्राचे वाचन केले जाते. मृत्यूनंतर वीस वर्षानंतरच ते वाचावे असेही जगतापांनी नमूद केलेले असते. वीस वर्षांनंतर वाड्यात आलेल्या प्रधानांना जुना नोकर रामशरण वाडा भीतीदायक असल्याचे भासवतो. विक्षिप्त वागतो. त्याकडे लक्ष न देता प्रधान मृत्यूपत्राचे वाचन करतात.

या वाड्यासाठी लालची असलेले जगतापांचे नातेवाईक चंद्रकांत, लिली, सुरेखा, शेखर, मनोहर, पद्मा हजर असतात. तीन लिफाफे प्रधान उघडतात. अखेर या वाड्याचे सर्व हक्क पद्माला जातात. पण त्यातही त्यांनी अट लिहून ठेवलेली असते. वंशपरंपरेनुसार वाड्याचे हक्क मिळणारी व्यक्ती वेडी ठरल्यास सर्व हक्क नातेवाईक पुरुषाकडे जातील. त्यानंतर एक स्वतंत्र लिफाफा मरणापूर्वी नोकर रामशरण यांच्याकडे जगतापांनी दिलेला असतो. तो पद्माला देतात. आलेले सर्व नातेवाईक आपल्याला मालमत्ता मिळाली नाही यामुळे हिरमुसलेले असतात.

शेवटी पद्माला वेडी ठरवून तिच्याकडून संपत्तीची चावी आपल्या हातात यावी यासाठी प्रयत्न सुरू होतात.. नाटकातील सस्पेन्स इथे सुरू होतो. इतर नातेवाईक पद्माला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. तिला रामशरणने दिलेला लिफाफा वाचण्याची विनंती करतात. पद्माचा जीवलग मनोहरच फक्त तीला साथ देत असतो. त्याच रात्री ॲड. प्रधान गायब होतात. सगळ्यांची पळताभुई होते. त्यानंतर सुरेखा गायब होते. पद्मा डगमगत नाही. अनेक प्रसंग तिच्यासमोर येतात. अखेर यातील मुख्य सूत्रधार शेखर असल्याचे पुढे येते. 

५१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत जिहादने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. जुनी संहिता असली तरी नाटक करताना स्वतःबरोबर रसिकांनाही आनंद मिळाला पाहिजे अशा कसोशीने स्पर्धेत उतरलो. १९८२ पासून नाट्यक्षेत्रात काम करताना यावर्षीही भूमिका करण्याची संधी मिळाली.  
- जयप्रकाश पाखरे,
संस्थापक अध्यक्ष

लहानपणी एकांकिकेत काम केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली. मनोहरच्या भूमिकेला अभिनयातून न्याय द्यायचा असेल तर वेगळेपणा राखायला हवा होते. भूमिका रसिकांनी उचलून धरली त्यामुळे समाधान वाटले. 
- महेंद्र पाखरे,
कलाकार

पात्र परिचय
रामशरण - राजेंद्र सावंत, प्रधान - जयप्रकाश पाखरे, चंद्रकांत - अविनाश सावंत, लीली - सौ. श्रद्घा औंधकर, सुरेखा -  सायली शिंदे, शेखर - स्वप्नील सावंत, मनोहर - महेश पाखरे, पद्मा - सौ. समीक्षा सावंत, मोहिते - कुलदीप कुरूप, डॉक्‍टर - गौरव सावंत. 

सूत्रधार आणि साह्य
दिग्दर्शक -अमोल रेडीज, पार्श्‍वसंगीत - प्रदीप कांबळे, नेपथ्य आणि रंगभूषा - गजानन पांचाळ, प्रकाश योजना - दयानंद चव्हाण, नेपथ्य सहायक - दिलीप सावंत, विवेक सावंत, मधुकर सावंत, प्रकाश योजना सहायक - विलास सावंत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com