पाटणकर खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

पाटणकर खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

रत्नागिरी - पैशाच्या व्यवहारातून ठेकेदाराचा रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून खून केल्याचा आरोप चौघांवर निश्‍चित करीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. व्ही. ए. दीक्षित यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुख्य आरोपीला आश्रय दिल्याबद्धल चौथ्या आरोपीला ३ वर्षाची सक्तमजुरीही सुनावली. 

घटना ३० ऑगस्ट २०१५ मध्ये पोमेंडीबुद्रुक येथील धनावडेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे पुलाजवळ घडली. अभिजित शिवाजी पाटणकर (वय २५, रा. शिवाजीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. मोईन महमद युसुफ काझी उर्फ मोईन उर्फ रॉनी ब्रिगेंझा उर्फ हेमंत शहा (वय २९, आशियाना मंझिल- कुवारबाव), फुजेल अहमदमिया काझी (वय २०, रा. मजगाव), रियाज हुसेन नदाफ ( वय २०, रा. कोकणनगर-अजमेरीनगर), आसीफ कलीम खान (वय २४, रा. पुरीआचार्य, पो. तेजगड, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) मोईन महमद युसुफ काझी व मृत अभिजित पाटणकर मित्र होते.

लोकांना वेगवेगळी काम करून देतो, परदेशी मोबाईल, वस्तू घेऊन देतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेत. यातील साक्षीदार वैभव मंगलदास भोजने यांच्याकडून मृत व काझी यांनी परदेशातील मोबाईल देतो, असे सांगून पैसे घेतले होते. या पैशातील वाटा आरोपीला न दिल्याने आरोपी मोईन काझी याने आरोपी फुजेल काझी, रियाज नदाफ, आसिफ खान यांच्याशी संगनमत करून दुचाकीवरुन शासकीय तंत्रनिकेतन येथे नेले. मोईन काझी याने अभिजितला दुचाकीवर घेऊन पोमेंडी ब्रुदूक येथील रेल्वे पुलाखाली नेले.

पैशाच्या वाट्यावरून दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोईन काझी याने गावठी रिव्हॉल्व्हरने अभिजित पाटणकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाणी वाहत असलेल्या नाल्यात टाकला. मोईन काझीने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आसिफ खान याने बेकायदेशीरपणे विकत घेतले होते. तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोईन काझी याला आश्रय देऊन गुन्ह्यात मदत केली. मयत याचा मोबाईल लपवून पुरावा नष्ट केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. 

ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. हेड कॉन्स्टेबल अनंत जाधव यांनी फिर्याद दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक एम. एस. थिटे यांनी तपास केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. विनय गांधी यांनी ३३ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. व्ही. ए. दीक्षित यांनी तीन आरोपींना जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद. तीन वर्षे सक्तमजूरी १ हजार दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद. आरोपी आसिफ खान यास तीन वर्षे सक्तमजूरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

पोलिसांनी केले वेशांतर
स्थानिक गुन्हे शाखेचे या गुन्ह्याच्या तपासामध्ये मोठे योगदान होते. मुख्य आरोपी गुन्हा करून फरार झाला होता. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून तो लखनौमध्ये असल्याचे उघड झाले. त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वेशांतर करून दोन ते तीन दिवस संशयितांचा शोध घेत होते. त्याच्या प्रयत्नांना यश आले. मोईन काझी यांच्यासह दोन आरोपींना लखनौ येथून शिताफीने अटक केली होती. 
 

खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परंतु ३३ साक्षीदारांच्या मदतीने परिस्थितीजन्य पुरावा उभा करून तो न्यायालयासमोर शाबित केला. तेव्हा आरोपींना ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने दिली. आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढत आहे. साडेतीन वर्षात २५ खटल्यात आरोपींनी शिक्षा झाली आहे.’’
 ॲड. विनय गांधी, जिल्हा सरकारी अभियोक्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com