मुंबई-गोवा महामार्गावर किलोमीटरमागे ५८३ वृक्षांची लागवड

मुंबई-गोवा महामार्गावर किलोमीटरमागे ५८३ वृक्षांची लागवड

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात हजारो झाडांची कत्तल होणार आहे; मात्र त्यातून पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी रस्त्याचे काम करीत असतानाच दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. एक किलोमीटरच्या अंतरात ५८३ झाडे लावण्याच्या सूचना शासनाने ठेकेदाराला दिल्या आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सहा मीटरमध्ये छोटी, मध्यम आणि मोठी अशी तीन स्वरूपाची झाडे लावली जातील. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे हा महामार्ग हरित महामार्ग बनविण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी झाडे लावण्याचे नियोजन झाले पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक वनस्पतींची झाडे महामार्गाशेजारील गावातच तयार करण्यात यावीत.’’
- श्रीनाथ कवडे, अभ्यासक

इंदापूर ते झाराप ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी आणि लांजा या चार तालुक्‍यांतील बहुतांशी मोबदला वाटप सुरू आहे. महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे आदेश नुकतेच संबंधित ठेकेदारांना प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार कामाला सुरवातही झाली आहे. चिपळूण तालुक्‍यातील बहूतांशी कामे आटपत आली असून संपादित जमीन समतल करण्यास सुरवात झाली आहे. चार तालुक्‍यांतील ५५ हजार ८८९ झाडे तोडली जाणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक परवानग्या मिळाल्या असून २६ लाख रुपये ठेकेदाराने संबंधित यंत्रणेकडे भरले आहेत.

इंदापूर ते झारापपर्यंत लाखो वृक्षांची कत्तल होणार असून त्याचा परिणाम पर्यावरणावर होईल असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात आले. वातावरण बिघडण्याची शक्‍यता असून सह्याद्रीत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण घटेल अशी भिती आहे. 
चौपदरीकरणानंतर हे प्रश्‍न उद्‌भवू नयेत यासाठी केंद्र शासनाने आधीच तयारी केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग हरीत महामार्ग बनविण्याची घोषणा केली होती. चौपदरीकरणासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या तीप्पट झाडांची लागवड केली जाणार आहे.

त्यामध्ये स्थानिक हवामानात वाढतील आणि भरपूर प्राणवायु सोडणाऱ्या झाडांची निवड करण्यात येणार आहे. लागवडीसाठी रस्त्याच्या जवळच्या ग्रामपंचायतींची मदत घेण्यात येणार आहे.
वृक्ष लागवडीचे तंत्र निश्‍चित केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार सोडून एक मीटरापासून वृक्ष लागवडीस सुरवात होईल. सहा मीटर अंतरावर झाडे लावण्यात येतील. पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे असतील. चढत्या क्रमाने झाडे लावली तर ध्वनी प्रदुषणाचा त्रास होणार नाही आणि पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील. झाडे मिळविण्यासाठी कंत्राटदाराने जवळच्या नर्सरीधारक किंवा वन विभागाची मदत घ्यावयाची आहे.

सव्वा दोन लाख झाडांचे लक्ष्य
प्रति किलोमीटरला ५३८ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्‍चित केले आहे. लागवड केलेल्या झाडांची देखभाल संबंधित ठेकेदाराला करावी लागेल. चौपदरीकरणानंतर महामार्गाच्या दुतर्फा २ लाख १३ हजारहून अधिक झाडांची लागवड करावी लागणार आहेत. त्यात छोटी झाडे १ लाख ११ हजार, मध्यम उंचीची ५६ हजार ४४८ तर उंच झाडे २८ हजार २२४ असतील. रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पर्शुराम ते झारापपर्यंतचा २७८ किलोमीटरचा पट्टा येतो. या भागात एक लाख ६० हजार झाडांची लागवड करावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com