जिल्हा परिषद शाळांच्या टीकाकारांना येगावचे उत्तर

प्रकाश पाटील
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सावर्डे - जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरला अशी ओरड करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी चिपळूण तालुक्‍यातील येगाव शाळा नं. १ जिल्ह्यामध्ये टॉप वन च्या दिशेने वाटचाल करत आहे.

सावर्डे - जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरला अशी ओरड करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी चिपळूण तालुक्‍यातील येगाव शाळा नं. १ जिल्ह्यामध्ये टॉप वन च्या दिशेने वाटचाल करत आहे. शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेला १० लाख रुपयांच्या शैक्षणिक उठावाने शाळेची सजावट आणि इमारत लक्षवेधी ठरत आहे. यापूर्वी शाळेने जि. प. चा आदर्श शाळा पुरस्कार पटकविला आहे.

मुख्याध्यापक अरविंद भंडारी यांनी शिक्षक संजय घाग, संभाजी निर्मळ, प्रकाश ठोंबरे या शिक्षकांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी शैक्षणिक उठावाला सुरवात केली. संगणक आल्यानंतर डिजिटल शाळा करण्याचा मानस व्यक्त केला. सावर्डे-तळवडे रस्त्यावरून शाळेची वास्तू रंगांमुळे उठून दिसू लागली. शाळेचे अंतरंग आणि बाह्यरंग उजळून निघाले आहे.

शाळेच्या कमानीपासून पंधरा फुटाच्या अंतरावर वाचनकुटीची संकल्पना अफलातून आहे. चार भिंतीबाहेर अध्ययन, अध्यापन वाचनकुटीत करता येते. शाळेच्या परिसरात नदीतून वाहणारे पाणी अडवून त्यावर भाजीपाला केला आहे. शाळेच्या प्रक्षेत्रावर पिकवलेला भाजीपाला पोषण आहारामध्ये वापरला जातो. गड, किल्ले शाळेच्या पटांगणात उभारले आहेत. आमदार अनंतराव गाडगीळ यांनी शाळेच्या विकासासाठी एक लाखाचा निधी दिला. त्यामध्ये सोलर सिस्टिम, संगणक, प्रिंटर याचा समावेश आहे. शाळेला भेट दिल्यानंतर गाडगीळ यांनी आपण निधी चांगल्या शाळेला दिल्याची भावना व्यक्त केली. राजाराम चव्हाण (पुणे), संजय चव्हाण यांनी आमदार निधी आणण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावली.

शाळेतील वैशिष्ट्ये
भाजीपाला मळा, कमळ टॅंक, स्वच्छ आणि प्रशस्त स्वच्छतागृह, हॅंड वॉश स्टॅंड, वाचन कुटी, काष्ठशिल्प, ग्रामीण साधनांचा संग्रह, भौतिक साधने, स्वावलंबन केंद्र, प्रशस्त बाग, संरक्षक कठडा, आकर्षक रंगसजावट.

Web Title: Ratnagiri News Yegaon ZP School special story