नद्यांतील गाळाबाबत आज बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

देवरूख - संगमेश्‍वरातील दोन नद्यांच्या गाळाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने याबाबतीत पुढील धोरण ठरविण्यासाठी संगमेश्‍वरातील व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांची संयुक्‍त बैठक उद्या (ता. ७) संगमेश्‍वर येथे होणार असल्याची माहिती पुनर्वसन प्राधिकरण समितीचे माजी अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.

देवरूख - संगमेश्‍वरातील दोन नद्यांच्या गाळाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने याबाबतीत पुढील धोरण ठरविण्यासाठी संगमेश्‍वरातील व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांची संयुक्‍त बैठक उद्या (ता. ७) संगमेश्‍वर येथे होणार असल्याची माहिती पुनर्वसन प्राधिकरण समितीचे माजी अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.

‘संगमेश्‍वरातील नद्या अडकल्या गाळात’ या आशयाचे वृत्त गेल्याच आठवड्यात ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आपण ही कार्यवाही सुरू करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले की, राज्यात आघाडी सरकार असताना २०११ ला आपल्या प्रयत्नाने चिपळूण आणि संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ३ नद्यांच्या गाळ काढण्याचे काम करण्यात आले. त्यानंतरच्या काळात या कामाला निधीच मिळालेला नाही. 

सध्या राज्यात असलेले युतीचे सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. या सरकारचे प्रतिनिधी असलेले स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रश्‍नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. त्यावेळी आपण स्वतः उभे राहून संगमेश्‍वरातील सोनवी नदीतील मारुती मंदिर ते संगम आणि शास्त्री नदीतील शास्त्रीपूल ते संगम एवढ्या भागातील गाळ उपसून घेतला होता. 

यानंतर सलग ४ वर्षे संगमेश्‍वरला पुराचा धोका बसलेला नाही. गाळ काढल्यामुळे नदीची खोली तर वाढलीच शिवाय उन्हाळ्यातील पाणी पातळीही चांगली राहिली. याचा सर्वांना फायदाच झाला. आजही संगमेश्‍वरात आपल्या कामाची आठवण काढली जाते. यानंतरही आपण अनेकदा शासनाकडे अशी कामे करण्याबाबतची मागणी केली होती मात्र त्याकडे लक्ष दिलेले नाही.

पावसाळ्यात पूर आला, की गाळ काढण्याचे आश्‍वासन लोकप्रतिनिधी देतात; मात्र विधानसभेत याचा पाठपुरावाच होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली.

निधीची मागणी करणार
आपण लोकनियुक्‍त प्रतिनिधी नसलो, तरी सामाजिक काम या जाणिवेतून संगमेश्‍वरातील गाळ काढण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेणार आहोत. यामध्ये व्यापारी तसेच ग्रामस्थांना सहभागी करून घेण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता संगमेश्‍वरात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांची मते आजमावून घेत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे आपण गाळ काढण्यासाठी निधीची मागणी करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.