न्यूनगंड झटकून ग्रामीण विद्यार्थी बोलू लागले इंग्रजी

- मयूरेश पाटणकर
शुक्रवार, 10 मार्च 2017

गुहागर - जिल्हा परिषद शाळेत पहिलीपासून इंग्रजी शिकविता येते. मराठी माध्यमातून शिकणारी चौथीपर्यंतची मुलेही इंग्रजीत बोलू शकतात, विचार करतात, कथा सांगतात. इंग्रजीबाबतचा कोणताही न्यूनगंड त्यांना नसतो. याचे प्रत्यंतर तालुक्‍यातील अंजनवेल शाळेत २०० पालकांना मिळाले. या यशस्वी प्रयोगाच्या शिल्पकार आहेत सोनाली अहिरराव. येथील मुलांनी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर इंग्रजीतून कथा सादर केल्या. वेगवेगळे संदेश देणारे कार्ड व साहित्य बनविले. त्याचे प्रदर्शन ‘इंग्लिश आर्ट एक्‍झिबिशन’ म्हणून सादर झाले. मुलांना फाडफाड इंग्रजी बोलताना पाहून गावकरी भारावले.

अंजनवेल ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळेत स्वतंत्ररीत्या इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घेतली. सौ. अहिरराव यांची शिक्षक म्हणून नेमणूक केली. त्या पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवतात. गेल्या सहा महिन्यांत आपली मुले काय शिकली याचे मूल्यमापन व्हावे, केवळ वर्गातच इंग्रजीचा अभ्यास न करता मुलांना सर्वांसमोर इंग्रजी बोलता यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा अशा हेतूने त्यांनी इंग्लिश आर्ट एक्‍झिबिशन या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात लता मंगेशकर, आशा भोसले, नरेंद्र मोदी अशा लोकप्रिय व्यक्तींची इंग्रजीत लिहिलेली माहिती, दगडावर लिहिलेले शब्द, चित्रातून शब्दलेखन, विद्यार्थ्यांना आवडलेल्या शब्दांची त्यांनी लिहिलेली माहिती, शुभेच्छा पत्रे, भेट कार्ड असे विविध प्रकार होते. तसेच काही टाकाऊ वस्तू सुशोभित करून त्यावर त्या वस्तूचे नाव लिहिण्यात आले होते.  या प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. यामधील ‘मायसेल्फ’ या हस्तलिखितात विद्यार्थ्यांनी स्वत:ची माहिती लिहिली होती. ‘माय लिटल चॅम्प्स्‌’मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना आवडलेल्या इंग्रजी कविता, गोष्टी, सुविचार, म्हणी, इंग्रजीतून मराठीत भाषांतर केलेल्या शब्दांची छोटी डिक्‍शनरी यांचा समावेश होता. या दोन्ही हस्तलिखितांचे प्रकाशन अंजनवेलचे उपसरपंच आत्माराम मोरे यांनी केले. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभिनयासह इंग्रजीतून कथा सांगितल्या. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत झगडे, वैद्य विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरिवले यांनी केले. यशस्वी २१ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच आत्माराम मोरे, वेलदूरचे सरपंच राम डांगे, अंजनवेल ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. 

मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना इंग्रजीबद्दल आत्मविश्वास नसतो. अंजनवेलमधील मुलांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जवळपास २०० ग्रामस्थ आणि मान्यवरांसमोर त्यांनी उत्तम पद्धतीने इंग्रजीत कथा सादर केल्या. ग्रामपंचायतीने दूरदृष्टीने गावातील मुलांसाठी ही संधी निर्माण करून दिली याचे कौतुक केले पाहिजे. 
- सोनाली अहिरराव, इंग्रजी शिक्षिका

अंजनेवल ग्रामपंचायतीने ग्रामनिधीमधून गावाच्या विकासासाठी वेगवेगळी कामे केली आहेत. येथील विद्यार्थ्याना इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने सर्व शाळांसाठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक केली. इंग्लिश आर्ट एक्‍झिबिशन च्या कार्यक्रमातून ही मुले जगाच्या पाठीवर यशस्वी होऊ शकतात याचा प्रत्यय आला आहे. 
- यशवंत बाईत, सरपंच, अंजनवेल

-ratchl९३.jpg- २१२६३
-ratchl९४.jpg- हस्तलिखिताचे प्रकाशन करताना उपसरपंच आत्माराम मोरे व अन्य मान्यवर.

Web Title: rural student speak in english