‘माणुसकीच्या वह्या’ परप्रांतातही पोचल्या! - युयुत्सु आर्ते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

साडवली - देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी ‘आमच्या येथे एक वही आणून द्या, आम्ही ती मुलांपर्यंत पोचवू’ असे आवाहन केले. त्याला बघता बघता प्रतिसाद मिळत वह्यांचा ढीग जमा झाला. आता आर्ते यांच्याकडून नाव नोंदणी करून मुले वह्या घेऊन जावू लागली. ‘माणुसकीच्या वह्या’ अशा रीतीने जिल्ह्यातच नव्हे, तर परप्रांतात बिहारपर्यंत पोचल्या, असे श्री. आर्ते अभिमानाने सांगतात.

आपण काय देतो, याऐवजी ते कसे देतो याला खूप महत्त्व आहे. गरीब होतकरू मुलांना एक वही देणं तसं सोप्प आहे; पण समाजातील लोकांना आमच्या येथे एक वही आणून द्या, आम्ही ती मुलांपर्यंत पोचवतो, या आर्ते यांच्या हाकेला साऱ्यांनीच प्रतिसाद दिला. देवरूखमधील जि.प.शाळा क्र. १, २, ३, ४ मधील तसेच हायस्कूल, महाविद्यालयीन मुलांना या वह्यांचे वाटप झाले. रत्नागिरी कोळीसरे शाळा, कुडवली येथील सांदिपनी गुरुकुल येथेही वह्या पोचल्या. ज्यांनी वह्या आणून दिल्या त्यांनाही एक वेगळेच समाधान मिळाले. देवरूख येथील सफाई कामगाराचा मुलगा शिक्षणासाठी मूळ गावी बिहारला गेला.

त्यालाही हा उपक्रम समजला. फोनवरून त्याने तो राहत असलेल्या वसतिगृहातील मुलांसाठी वह्यांची मागणी केली. आर्ते यांनी मुलगा आकाशच्या वडिलांकडे वह्या आणि शालोपयोगी साहित्य दिले. ते त्यांनी बिहारला नेऊन दिले. बिहारमधील वसतिगृहाच्या अधीक्षकांनी वह्या आणि शालोपयोगी साहित्य भेट मिळाल्यावर मुलांच्या वतीने फोनवरून आर्ते यांचे आभार मानले. तसेच आमच्या वसतिगृहाला भेट द्यावी, अशीही विनंती केली. आर्ते यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजूनही समाजातून आर्तेंच्या उपक्रमासाठी वह्या जमा होत आहेत.