संघर्ष यात्रेचा अंतिम टप्पा रायगडावरून सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष

कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष
महाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला बुधवारी रायगडावरून सुरवात करण्यात आली. मात्र, कोकणातून संघर्ष यात्रा काढताना स्थानिक आंबा- काजू पिकांचे नुकसान, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि भात हमीभावाच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कोकणातून ही यात्रा काढण्याचा उद्देश काय, असा प्रश्‍न कोकणातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी विरोधी पक्षांनी कोकणातून अंतिम यात्रा काढली. यात्रेतील नेत्यांनी रायगडावर जात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच, जगदीश्वराचे दर्शन घेत सरकारला सद्‌बुद्धी देण्यासाठी व कर्जमाफीसाठी साकडे घातले. तेथून चवदार तळे गाठत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यानंतर रायगड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

'संघर्ष यात्रेचा अंतिम टप्पा आम्ही सुरू केला आहे. ही संघर्ष यात्रा निश्‍चितच निर्णायक ठरेल. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्व विरोधी पक्षांनी काढलेल्या या यात्रेला यश येईल,'' असा विश्वास या वेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे रोज नवीन प्रश्न पुढे येत आहेत. शेतीमालाला दर नाही, तूरडाळ खरेदी नाही, शेतकऱ्यांच्या 64 टक्के आत्महत्या वाढल्या आहेत. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, त्यामुळे शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे स्पष्ट करत आगामी अधिवेशनामध्ये याबाबत काय भूमिका घ्यायची हे लवकरच बैठकीत ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व शेतीमालाला 50 टक्के नफा मिळवून देणे, या प्रमुख उद्देशासाठी संघर्ष यात्रा असून कोकणात मच्छीमार, बागायतदार यांचे प्रश्न जरी वेगळे असले, तरीही राज्यातील शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. सरकार मात्र उदासीन भूमिका घेत आहे, अशी टीका केली.

अंतिम टप्प्यातील या यात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते.

भाजपची "शिवराळ' यात्रा
शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरही विखे पाटील यांनी जोरदार टीका केली. मुंबई पालिका निवडणुकीवेळी राजीनामा खिशात घेऊन फिरणारे शिवसेनेचे आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजीनामा का देत नाहीत, असा सवालही त्यांनी या वेळी केला. भाजपने सुरू केलेली यात्रा ही संवाद यात्रा नसून "शिवराळ यात्रा' आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कोकणच्या प्रश्‍नांवर त्रोटक उत्तरे
कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न या यात्रेत प्रभावीपणे मांडले जात नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. वारंवार होणारे आंबा- काजू नुकसान; तर कोकणातील जलसिंचन प्रकल्प आघाडी सरकारच्या काळात रखडलेले होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात आले; परंतु कोकणातील प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे या वेळी पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर संघर्ष यात्रेतील नेत्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. आलिशान गाड्या व संघर्ष यात्रा नामफलक लावलेल्या वातानुकूलित आराम बसमधून ही यात्रा रत्नागिरीकडे रवाना झाली.

फोटो- ए00942
रायगड ः विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रारंभ बुधवारी रायगडावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन झाला, त्याप्रसंगी पक्षांचे नेते.