करुळ केगदवाडीत वीज पोचली दहा वर्षांनी

करुळ केगदवाडीत वीज पोचली दहा वर्षांनी

वैभववाडी - करुळ केगदवाडी ग्रामस्थांच्या दहा वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून झालेल्या औपचारिक उद्‌घाटनानंतर केगदवाडीत वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षे अंधारात चाचपडणाऱ्या केगदवाडीवासीयांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद पाहायला मिळाला. आता रस्ता केगदवाडीपर्यंत नेण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.

वीज, पाणी आणि रस्ता यासाठी अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ पाठपुरावा करीत होते. वाडीभोवती व नखात्याची जमीन असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या जाचक अटी बाधक ठरत होत्या. तीन वर्षांपासून पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी उठाव सुरू केला. त्याला आमदार नीतेश राणे, खासदार विनायक राऊत, प्रमोद जठार या लोकप्रतिनिधींचे राजकीय पाठबळ मिळत गेले. त्यातच वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. लोथे यांनी सकारात्मक प्रयत्न केले. वन विभागानेही सहकार्याची भूमिका घेत जमिनीतून वीजवाहिन्या नेण्यास सहमती दिली. वीज वितरणने हे अवघड काम अवघ्या काही दिवसांत पूर्ण केले.

वन विभागाचे उपवनसरक्षंक समाधान चव्हाण, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांच्या हस्ते कामांचे उद्‌घाटन झाले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील, सरपंच सरिता कदम, रमेश सुतार, वनक्षेत्रपाल स. बा. सोनवडे, वनपाल चंद्रकांत देशमुख, संदीप पाटील, हेमंत पाटील, गजानन पाटील, राजेंद्र गुरखे, बापू गुरखे, संतोष बोडके उपस्थित होते. 

सर्व यंत्रणा एकत्र आली की कोणतेही काम मार्गी लागू शकते. हे केगदवाडीवरून स्पष्ट झाले आहे. प्रत्येक विभागाने काम प्रामाणिकपणे मेहनत केल्यामुळेच हे काम झाले.
- समाधान चव्हाण, उपवनसरंक्षक, सिंधुदुर्ग.

कित्येक वर्षे आम्ही अंधारात काढली; परंतु लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे अखेर  केगदवाडीत वीज आली. आता रस्त्यासाठी एकत्र यावे.’’
- धोंडू गुरखे, ग्रामस्थ, करुळ केगदवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com