पावसाळी पर्यटनाने विकासाची संधी

प्रकाश पाटील
गुरुवार, 27 जुलै 2017

चिपळूण पश्‍चिम भागात अनेक स्थळे परिचित होत आहेत. काही ठिकाणी रस्ते कच्चे असले तरी सुरक्षित आहेत; मात्र यातील काही स्थळांना पायाभूत सुविधा देऊन विकसित करणे गरजेचे आहे. शासनाचे पूर्णतः याकडे दुर्लक्ष आहे.          
- अनिरुद्ध निकम, ग्रामस्थ, सावर्डे

चिपळूण तालुका - निसर्गाचे लेणे पाहण्यासाठी मूलभूत सुविधा हव्यात 

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करताना सावर्डेतून वहाळच्या दिशेने जाताना केवळ २८ किलोमीटरच्या टप्प्यात म्हणजेच चिपळूण तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना पावसाळ्यात खुणावू लागली आहेत. निसर्गसंपन्न कोकणाच्या कोंदणात विसावलेल्या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. निकम स्मारक, शारदादेवी मंदिर, शिरंबेतील पाण्यातील मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

सावर्डे कापशी नदी तीरावर शिक्षणमहर्षी गोविंदरावजी निकम यांचे विलोभनीय स्मारक आहे. स्मारकाशेजारी असणारा बगीचा, वैकुंठेश्‍वराचे मंदिर, स्मृतिगंध वस्तुसंग्रहालय आणि कापशी नदीवर बांधण्यात आलेले बंधारे आणि खळाळणारे पाणी हे पर्यटकांना खुणावते. नदीपात्रात साठलेले पाणी आणि अवकाशातून खंड्या पक्ष्याचे मासे टिपणे हे दृश्‍य पर्यटकांना मोहवून जाते. सभोवताली पिवळ्या चाफ्यांना लागलेली फुले येथे येणाऱ्यांना प्रसन्न करतात. 

निकम स्मारकापासून केवळ १३ किलोमीटरवरील तुरंबवचे सुप्रसिद्ध शारदादेवी मंदिर हिरवळीत नटलेले आहे. भव्य वास्तू, प्रसन्न व शांत वातावरण आणि देखणे मंदिर. यामुळे पर्यटक सुखावून जातात. दसऱ्याला या ठिकाणी मोठा उत्सव होतो, मात्र वर्षभर राज्यभरातून भक्तगण श्रद्धेने येथे येतात. तुरंबवपासून १० किलोमीटरवर शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर हे चारीबाजूंनी नितळ पाणी असलेल्या तळ्यात आहे. कोकणातील तळ्यातील ते एकमेव मंदिर आहे. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे उत्सव भरतो. मंदिर प्राचीन असून लाकडी खांबावर उभारले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी छोटा पूल आहे. गाभाऱ्यात श्री देव मल्लिकार्जुनची पाण्यातील मूर्ती पाहताक्षणी भक्तांना वेगळीच अनुभूती येते. शिरंबेपासून पाच किलोमीटरवर घनदाट झाडीमध्ये देवपाटचा धबधबा खळाळून वाहत असतो. ग्रामस्थांनी धबधबा कोसळतो तेथे कठडे बांधून पाणी अडवले आहे.