स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका - विजय जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

शिक्षणासोबतच आजुबाजूच्या परिस्थितीचेही योग्य निरिक्षण करणे आवश्‍यक आहे. वाचनालयात जावून वाचनात सातत्य ठेवायला हवे. त्याचा मोठा फायदा आपल्याला होतो.
- खेमसावंत भोसले

सावंतवाडी - जीवनात यशस्वीतेसाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी. स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका. एकाग्रता, स्मरणशक्ती तसेच कार्यक्षमाता वाढविण्यासाठी योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा करा, असे आवाहन आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराम महाविद्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत शिवरामराजे भोसले याची ९० वी जयंती संस्थापक दिन म्हणून येथे झाली. या वेळी श्री. जोशी बोलत होते. संस्थेच्या कार्यकारी विश्‍वस्त सत्वशीलादेवी भोसले, संस्थानचे राजगुरू राजेंद्र भारती महाराज, अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, विश्‍वस्त लखमराजे भोसले, संचालक ॲड प्रमोद प्रभूआजगावकर, सहसंचालक प्राध्यापक डी. टी. देसाई, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, ॲड. शामराव सावंत, नाना नाईक, राजू बेग, प्रकाश परब, विश्‍वनाथ पेडणेकर उपस्थित होते.

श्री. जोशी म्हणाले, ‘‘मनात कायम सकारात्मक विचार ठेवायला हवे. ध्येय ठरवून वेड्यासारखे प्रचंड कष्ट घ्यायला हवे. आपल्याला आय. पी. एस व्हायचे होते; मात्र झालो नाही. आज उपजिल्हाधिकारी झालो त्यामुळे आज जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांचे मागदर्शन देवू शकलो. परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.’’

या वेळी रावी प्रभूकेळूसकर आणि चंद्रकांत मुंडये यांनी राजेसाहेब शिवरामराजेंविषयी माहिती सांगितली. तर मोरेश्‍वर पोतनिस यांनी कविता सादर केली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. डॉ. डी. एल भारमल यांनी प्रास्ताविक केले. राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांचा परिचय डॉ. गणेश मर्गज यांनी करून दिला.