संशयित 'मेसेज'प्रकरणी युवक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - "इसिस' या दहशतवादी संघटनेच्या नावाने मोबाईलवर संदेश पाठविल्या प्रकरणी काल रात्री उशिरा कोलगाव येथील युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची आज उशिरापर्यंत स्थानिक गुन्हा अन्वेषणकडून चौकशी सुरू होती. दरम्यान, प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगून तपास झाल्यानंतर माहिती देण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सांगितले.

शहरातील एका युवकाच्या व्हॉट्‌सऍपवर एक संदेश आला होता. व्हॉट्‌सऍपच्या डीपीवर त्याने "इसिस इस्लाम' असा फोटो लावला होता. तसेच आपले नाव कादीर बेग असून, आपण इस्लामाबाद येथील आहे. तू इसिसमध्ये जॉईन होण्यास इच्छुक आहेस का? असा मोबाईलवर संदेश पाठविला होता. अचानक आलेला संदेश पाहून तो युवक घाबरला. त्याने याबाबतची माहिती मित्रांच्या माध्यमातून पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ काल सायंकाळी कोलगाव चाफेआळी येथील त्या युवकाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ताब्यात घेतलेला युवक हा त्या युवकाचा मित्रच असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर झालेल्या चौकशीत आपण हा प्रकार चेष्टेने केल्याचे त्या युवकाचे म्हणणे आहे; मात्र पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, एटीएसच्या माध्यमातून पुढील तपास सुरू करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले. आज सकाळी कोलगाव येथील त्या युवकाला पुन्हा चौकशीसाठी ओरोस येथे नेण्यात आले. एटीएस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून त्याची उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे.