सावंतवाडीत 103 मुलांच्या अपहरणाची अफवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सावंतवाडी - तब्बल 103 मुलांच्या अपहरणाच्या निनावी दूरध्वनीमुळे येथील पोलिसांची तारांबळ उडाली. खातरजमा केली असता, ती मुले एका धार्मिक संस्थेशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार रविवारी (ता. 23) रात्री दोनच्या सुमारास घडला. येथील मळगाव रेल्वे स्थानक परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी साडेअकरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

सिंधुदुर्ग पोलिस नियंत्रण कक्षाला मुंबई नियंत्रण कक्षातून माहिती देण्यात आली. त्यात अज्ञात व्यक्तीकडून दिलेल्या माहितीनुसार पाटणा- वॉस्को या रेल्वेगाडीतून अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना गोव्याच्या दिशेने नेले जात आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार येथील पोलिसांनी मळगाव रेल्वे स्थानकात सापळा रचला. ती मुले याच स्थानकावर उतरली. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही सर्व मुले ही आठ ते अकरा वर्षे वयोगटातील आहेत. आजरा आणि सावंतवाडी येथील एका धार्मिक संस्थेत संबंधित मुले शिक्षण घेत असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यांच्यासमवेत असलेले तिघे जण शिक्षक असल्याची माहिती मिळाली. सर्व मुलांचे जवाब घेऊन त्यांना पाठवून देण्यात आले. 

बिहारच्या विद्यार्थ्यांचा समावेश 
याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस आणि निरीक्षक धनावडे यांनी दिली. ते म्हणाले, ""संबंधित विद्यार्थी बिहारमधील आहेत. शिक्षणासाठी ते सावंतवाडी आणि आजरा येथील संस्थेत येतात. धार्मिक सणासाठी महिनाभर सुटी असल्यामुळे ते गावी गेले होते. ते परतत असताना हा प्रकार घडला. आम्ही या प्रकाराची चौकशी केली; मात्र कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही. चौकशी केलेल्या शिक्षण संस्थाही अधिकृत आहेत.''