शिवसेना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मंडणगड - ढोल-ताशांचा गजर, चेहऱ्यावर उत्सुकता, फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि विजयाचा जल्लोष असे वातावरण तहसील कार्यालयाबाहेर पाहायला मिळाले. 

मंडणगड - ढोल-ताशांचा गजर, चेहऱ्यावर उत्सुकता, फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि विजयाचा जल्लोष असे वातावरण तहसील कार्यालयाबाहेर पाहायला मिळाले. 

प्रथम टपाली मतांची मोजणी करण्यात आली. यात दोन तास गेले. त्यानंतर मतदान यंत्रे उघडण्यात आली. शिरगाव, उमरोली गट व शिरगाव, उमरोली, भिंगळोली आणि देव्हारे गणाचे निकाल हाती येत होते. कोण पुढे कोण मागे याची चर्चा सर्वच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. पहिला उमरोली गणाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागल्याने सेनेचे कार्यकर्ते उत्साहित होते. पाठोपाठ अन्य पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर तालुक्‍यात शिवसेना-राष्ट्रवादीला समान जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर जल्लोष केला. 

‘शिवसेना जिंदाबाद’, ‘हा आवाज कोणाचा, शिवसेनेचा’ अशा प्रकारच्या घोषणांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. ‘राष्ट्रवादी आगे बढो’, ‘मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचाच बोलबाला’, अशा घोषणा राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या. दोन्ही पक्षांचे झेंडे दिमाखाने फडकत होते. तालुक्‍यात शिवसेनेसह राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा या निवडणूक निकालाने सिद्ध झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला आहे.

११२६ जणांचा ‘नोटा’
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन गट व चार पंचायत समिती गणातून ११२६ मतदारांनी वरीलपैकी एकही नाही (नोटा) बजावला आहे. त्यामुळे आपले मतदार का नाकारतात याचा विचार प्रस्थापित राजकारण्यांनी करण्याची वेळ आली आहे.

टपाली मतांमधील वीस मते बाद 
तालुक्‍यात दोन जि.प. व चार पं.स. करिता १५६ शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदान केले. यामध्ये चुकीच्या पद्धतीने माहिती भरल्याने चक्क वीस मते बाद करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांना मतदान करता न आल्याचे यामुळे उघड झाले.

Web Title: Shiv Sena, NCP workers celebrating