ताकद आजमावण्याची सेना, भाजपला संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

चिपळूण - महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती तोडण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपही सर्व जागांवर आपले उमेदवार देणार आहे. युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला उत्साह होता. आता जिंकून येण्यासाठी उमेदवारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही पक्षांना जिल्ह्यात आपली ताकद आजमाविण्याची संधी आहे.

शिवसेना, भाजपची युती होणार नसल्यामुळे दोन्ही पक्षांना त्याचा काही प्रमाणात फटका बसणार हे निश्‍चित आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे २५ आणि भाजपचे ७ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून असलेली ओळख कायम ठेवण्यासाठी सेनेला प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार मिळणे कठीण आहे, तर काही ठिकाणी प्रबळ इच्छुकांची स्वप्नपूर्ती होणार आहे. अनेक संधिसाधू कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या पक्षात नव्याने आयात झालेल्या कार्यकर्त्यांमुळे जुने कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटकाही निवडणुकीवर होण्याची शक्‍यता आहे. युती न झाल्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी कशा पद्धतीने उचलते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजपची दिशा स्पष्ट झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होईल, अशी शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि काँग्रेसचे नीलेश राणेंमध्ये बोलणी सुरू आहेत. 

रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील मतदार याहीवेळी शिवसेनेच्याच उमेदवारांना निवडून देतील. भाजपची जिल्ह्यात कुठेही ताकद नाही. पालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे जिल्ह्यात भाजपला अपयश आले तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही होईल.
- राजन साळवी, आमदार, राजापूर.