शिवसेनेपुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान

- सिद्धेश परशेट्ये
शनिवार, 28 जानेवारी 2017

खेड - तालुक्‍याच्या ग्रामीण भागात शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. भाजप आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तिरंगी लढती होतील. 

शिवसेनेचा वारू रोखणे हे दोन्ही पक्षांपुढे आणि त्यातही आमदार संजय कदम यांच्यापुढे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या भागात शिवसेनेने सुरूंग लावल्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला तटबंदी करावी लागणार आहे. तालुक्‍यात कधी नव्हे तो भाजप सर्व जागा लढवणार आहे; मात्र त्याची मदार आयात नेते व कार्यकर्त्यांवरच आहे.

तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचे ७ गट, तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्‍यातील सध्याच्या राजकीय वर्चस्वाचा  विचार केला, तर शिवसेना आघाडीवर आहे. राष्ट्रवादीकडे जिल्हा परिषदेच्या ३, तर पंचायत समितीच्या ६ जागा आहेत. ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने परंपरांगत मित्र काँग्रेसला बाजूला करून पालिका निवडणुकीप्रमाणेच यावेळी मनसेशी आघाडी केली आहे. भाजप तालुक्‍यात अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडत आहे. सेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून विविध मार्ग अवलंबले जात आहेत; परंतु राष्ट्रवादी व मनसे आघाडीमुळे दोन्ही पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरली.

त्यामुळे आघाडीचा परिणाम विपरित झाला. भाजपने एकला चलोची भूमिका घेत शतप्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. तालुक्‍यात काँग्रेसचा पारंपरिक मतदार जागरूक आहे. युती संपल्याचा तोटा सेनेला होईल. भाजपला फायदा होण्याऐवजी मतांच्या विभागणीने राष्ट्रवादी-मनसे आघाडीला फायदा 
होईल.

अशा स्थितीत शिवसेनेची मांड अधिक पक्की करण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे. संजय कदम व रामदास कदम यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण 
आस्तान, भरणे, सुसेरी - सर्वसाधारण स्त्री 
फुरूस, भोस्ते, लोटे, धामणदिवी - सर्वसाधारण
(सध्याची राजकीय स्थिती - सात गट ः शिवसेना - चार, राष्ट्रवादी -तीन)
 
पंचायत समिती गणनिहाय आरक्षण 
तळे, पन्हाळजे - नामाप्र स्त्री 
आस्तान, शिरवली, भरणे, चिंचघर, सुसेरी - सर्वसाधारण स्त्री 
फुरूस - अनुसूचित जाती राखीव
गुणदे, भोस्ते, लोटे, धामणदिवी - सर्वसाधारण
धामणंद, शिव बुद्रूक- नामाप्र    
(सध्याची राजकीय स्थिती - चौदा गण ः शिवसेना  आठ, राष्ट्रवादी सहा)