...अन्यथा ११ सप्टेंबरपासून संप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इशारा; मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसंदर्भात पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्यास २ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ११ सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इशारा; मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसंदर्भात पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्यास २ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ११ सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला.

निवेदनात म्हटले आहे, की राज्याने मानधन वाढीसंबंधी शिफारस करण्यासाठी २० जून २०१६ ला कमिटी नेमली. चर्चेअंती ९ मार्चला सेवाज्येष्ठता व शिक्षण यावर आधारित शिफारशी करणारा अहवाल शासनाला सादर केला. ३० मार्चला पंकजा मुंडे यांनी संघटनेशी चर्चा करून १ मेपर्यंत आदेश काढण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र तसे आदेश अद्याप निघालेच नाहीत. त्यानंतर ३० मेस संपाचा इशारा दिला म्हणून ६ जूनला पुन्हा चर्चा झाली; मात्र अद्याप अर्थखात्याकडे महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावच पाठविला नाही. महिला व बालकल्याणमंत्री वेळकाढू धोरण अवलंबत आहेत.

राज्यात कुपोषणाचे प्रमाण विशेषतः आदिवासी भागात वाढतच आहे. ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणारा पुरक पोषण आहार (टीसीआर) ती मुले खातच नाहीत. त्यामुळे त्यावरील कोट्यवधी रुपये निधी वाया जात आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना इंधनासह ४ रुपये ९२ पैसे दिले जातात. त्यामध्ये सकाळी लाडू व दुपारी आहार द्यायचा आहे. दर निश्‍चित झाल्यापासून तिप्पटीने महागाई वाढली. सुमारे ३०० टक्के महागाई वाढली तरी सरकारने २० जुलैला केवळ २० टक्केच वाढ केली. अंगणवाड्यांना मिळणारा ३ रुपये किलोचा तांदुळ व २ रुपये किलोचा गहू मिळालाच नाही. तो वर्षभर गायब झाला ाहे. तरी शासनाला कुपोषण थांबवायचे असेल तर प्रती लाभार्थी १५ रुपये एवढा दर निश्‍चित करावा अशी मागणी आहे.

या मागण्यांसाठी आतापर्यंत बरीच आंदोलने झाली. सरकारच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवला; मात्र आता जोपर्यंत मागण्यांचा विचार होत नाही, मानधन वाढीसाठी पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद न झाल्यास ११ सप्टेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा निवेदनातून दिला आहे.