टाऊन पार्कची देखभालीअभावी दुरवस्था...

नंदकुमार आयरे 
शुक्रवार, 2 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गनगरीच्या विकासात भर घालणारे प्रशस्त टाऊन पार्क उभारले. त्याचे उद्‌घाटनही मोठ्या थाटामाटात पार पडले; मात्र त्याच्या देखभालीच्या अभावामुळे सद्य:स्थितीत टाऊन पार्कची दुर्दशा पाहायला मिळत आहे.

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गनगरीच्या विकासात भर घालणारे प्रशस्त टाऊन पार्क उभारले. त्याचे उद्‌घाटनही मोठ्या थाटामाटात पार पडले; मात्र त्याच्या देखभालीच्या अभावामुळे सद्य:स्थितीत टाऊन पार्कची दुर्दशा पाहायला मिळत आहे.

येथील रहिवाशांना विरंगुळा म्हणून टाऊन पार्कची सफर करता यावी यासाठी जिल्हा मुख्यालय प्राधिकरण क्षेत्रात मोक्‍याच्या ठिकाणी प्रशस्त जागेत टाऊन मार्कची निर्मिती केली. यासाठी लाखो रुपये खर्च करून सुशोभिकरणाची कामे, स्टॉल्ससह विविध सुविधा निर्माण केल्या. सुरुवातीला नयनरम्य अशा वाटणाऱ्या या टाऊन पार्कचे उद्‌घाटनही मोठ्या थाटामाटात प्रशासनाकडून झाले. परंतु पार्कच्या देखभालीचे काय? या प्रश्‍नाकडे मात्र प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्षच केलेले दिसत आहे. सद्य:स्थितीत वापराविना बंद असलेले स्टॉल आणि सुशोभित बगीचामध्ये उगवलेले गवत आणि जंगली झाडे यामुळे टाऊन पार्कची दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील रहिवाशांना आणि लहान मुलांना विरंगुळा म्हणून टाऊन पार्कमध्ये वेळ घालविता यावा. येथे येणाऱ्या लोकांना चहा पान खाद्यपदार्थाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी स्टॉलही उभारले; मात्र ते गेल्या पाच वर्षात उघडलेलेच नाहीत.

टाऊन पार्कची स्वच्छता व देखरेख करण्यासाठीची यंत्रणा प्रशासनाने निर्माण न केल्याने आणि तेथील स्टॉल व अन्य सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेले टाऊन पार्क सद्य:स्थितीत दुर्लक्षित आहे. सुविधाच नसल्याने व स्वच्छता नसल्याने टाऊन पार्ककडे कोणी फिरकत नाही. सिंधुदुर्गनगरीच्या विकासाची सूत्रे हाती घेतलेल्या नवनगर प्राधिकरणकडून दरवर्षी लाखो रुपये निधी विकासकामांवर खर्च केला जातो. तरीही पाहिजे तसा विकास पहायला मिळत नाही तर झालेल्या विकासकामांकडे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने विकासकामे होवूनही त्यांची दुर्दशा झालेली आहे. विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार व निकृष्ट कामे यामुळे येथील रस्तेही येत्या २५ वर्षात विकसित झालेले दिसत नाहीत. दरवर्षी केवळ रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे सोपस्कर पूर्ण केले जातात. केवळ ठेकेदारांना पोसण्याचेच काम यातून होताना दिसत आहे. जिल्हा नवनगर प्राधिकरणकडून केवळ विकासाच्या संकल्पना राबविल्या जात असल्या तरी देखभाल दुरुस्तीबाबत कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने प्राधिकरणचा विकास कामांवर झालेला लाखो रुपये निधी वाया जात आहे.