४२ हजार हेक्‍टर शेती पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सिंधुदुर्गनगरी -  गेले पंधरा दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ४२ हजार हेक्‍टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मात्र नुकसान झालेल्या शेतीच्या पंचनाम्यांना अद्याप सुरवात झालेली नाही. सध्या हळवी भात शेती पक्‍व झाली असून भाताला कोंब येण्यास सुरवात झाली आहे. परतीच्या पावसाचा जोर कायम राहिला असल्याने जिल्ह्यातील ८० टक्‍के भात शेतीचे नुकसान होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली. 

जिल्ह्यात ५३ हजार ३०० हेक्‍टर क्षेत्रात भात व नागली पिकाची लागवड करण्यात आली आहे. यातील हळवी भात शेती पूर्णत: पक्‍व झाली आहे. तर इतर भात पिके फुलोऱ्यावर आली आहेत. १६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झालेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळवी भातशेती कापण्याची तयारी केली आहे. परंतु दुपारपर्यंत मळभ असलेले वातावरण आणि दुपारी दोन नंतर कोसळणारा पाऊस यामुळे भातकापणी शक्‍य झालेली नाही. जिल्ह्याच्या अनेक भागातील शेती बरेच दिवस पाण्याखाली राहिली असल्याने, हातातोंडाशी आलेली शेती पिके जमिनीवर आडवी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

जिल्ह्यातील ८० टक्‍के भात शेती पाण्याखाली असल्याने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे व्हावेत अशी मागणी गेले आठ दिवस शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याबाबतचे कोणतेही आदेश कृषी विभागाला देण्यात आलेले नाहीत. शेतीच्या नुकसानीबाबत दरवर्षी राजकीय लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवला जातो. यंदा ग्रामपंचायत निवडणुका असल्याने सर्वच पक्षाची नेतेमंडळी निवडणुकीत गुंतली आहेत. यात नुकसानग्रस्त भात शेतीकडे बघण्यासही कुणाला वेळ मिळालेला नाही.